एक अजब प्रकार समोर आला आहे. एका तृतीयपंथीयाने लग्न करण्यासाठी आठ लाख रुपये खर्चून लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. प्रियकरासोबत लग्न करण्याची स्वप्न बघत असतानाच मात्र घडलं असं काही की त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तृतीयपंथीयाने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. त्यासाठी त्याने तब्बल आठ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर दोघेही काही महिने पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांतच प्रियकर पुन्हा त्याच्या घरच्यांकडे गेला. प्रियकराने साथ सोडल्यानंतर पीडिता नैराश्यात गेली. तिने अनेकदा त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या घरच्यांनी तिला त्याला भेटूनच दिले नाही. प्रियकराने धोका दिल्यामुळं पीडितेचे आयुष्य उद्ध्व्स्त झाले आहे. तर, तिची आर्थिक परिस्थितीदेखील खालावली आहे. तिच्याकडे असलेले सर्व जमापुंजी संपत आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीय राहुल कुमार कौशांबी येथे राहतो. तो तृतीयपंथीय असल्याचे कळताच त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासोबत दुजाभाव करण्यास सुरुवात केला. या सगळ्या प्रकाराला वैतागून त्याने घर सोडले. नकळत्या वयातच त्याने कमावण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये त्याची ओळख सतीष उर्फ संतोषसोबत झाली. दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
सतीषने राहुलला लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. तेव्हा तब्बल 8 लाख रुपये खर्चून त्याने शस्त्रक्रिया करुन घेतली. राहुल आता रागिणी बनून समाजात वावरु लागला. रागिणी आणि सतीष दोघांनीही मंदिरात लग्न केले. त्यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून सोबत राहू लागले. जवळपास सहा महिने एकत्र राहिल्यानंतर सतीशचे कुटुंबीय एक दिवस आले आणि त्याला घेऊन गेले.
कुटुंबासोबत निघून गेल्यानंतर सतीषने आता रागिणीसोबत संपर्क तोडून टाकला आहे. रागिणी त्याला भेटायला त्याच्या घरी गेल्यानंतर तिच्यासोबत मारहाण करण्यात आली. रागिणीची दुसऱ्या जातीची असल्यामुळं सतीशच्या घरचे तिला त्याला भेटू देत नसल्याचा आरोप रागिणीने केला आहे. सतीश घरच्यांच्या बोलण्यात आला असून म्हणूनच त्याने मला भेटण-बोलणे बंद केले आहे, असंही तीने म्हटलं आहे.
रागिणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. तसंच, तपासात जे समोर येईल त्याप्रमाणेच कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.