नवी दिल्ली : केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कवच काढून घेतलं आहे. मात्र सिंग यांची झेड प्लस सुरक्षा कायम असेल. देशाचे माजी पंतप्रधान असल्याने मनमोहन सिंग यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. एखाद्या व्यक्तीला कितपत धोका आहे, त्याआधारावर सुरक्षा ठरवली जाते. सुरक्षा यंत्रणांकडून नियमित आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल केले जात असतात, असे केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मनमोहन सिंग यांनी २३ ऑगस्टला सहाव्यांदा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
सुरुवातीला पंतप्रधानांना त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर १० वर्षांपर्यंत एसपीजी सुरक्षा दिली जायची. पण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ही कालमर्यादा १ वर्षापर्यंत करण्यात आली. मनमोहन सिंग हे लागोपाठ २ कार्यकाळ २००४ ते २०१४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे २०१५ पर्यंत त्यांना एसपीजी सुरक्षा मिळणं गरजेचं होतं. पण धोका लक्षात घेता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजेच २०१८ पर्यंत एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती.
भारतामध्ये सध्या फक्त ४ जणांनाच एसपीजी सुरक्षा देण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतच प्रियांका गांधी यांना खास तरतुदीतून एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे.