Mobile Tower Stolen in Patna: बिहारची (Bihar) राजधानी असलेल्या पटना शहरामध्ये (Patna City) चोरांची हिंमत एवढी वाढली आहे की त्यांनी थेट एक मोबाइल टॉवरच चोरला आहे. पटना येथील मोबाईल टॉवर चोरीचं (Mobile Tower Stolen) हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहार पोलिसही चक्रावले आहेत. ही घटना पीरबहोर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सब्जी बाग येथे घडली आहे. येथील एका घराच्या गच्चीवर उभारण्यात आलेला मोबईल टॉवर (Mobile Tower) चोरण्यात आला आहे. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार 2006 पासून हा टॉवर या ठिकाणी होता. हा एअरसेल कंपनीच्या मालकीचा टॉवर होता. मात्र नंतर तो जीटीएल कंपनीने विकत घेतला होता. सध्या याच कंपनीकडे या टॉवरची मालकी होती.
हा मोबाईल टॉवर ज्या घराच्या गच्चीवर उभारण्यात आलेल्या त्या घरी काहीजण अचानक पोहोचले. त्यांनी आपण जीटीएल कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी गच्चीवर जाऊन चार तासांमध्ये हा मोबाईल टॉवर डिस्मेंटल म्हणजेच एक एक भाग काढून सुटा केला. या टॉवरचे सर्व सुटे भाग हे लोक गाडीमधून घेऊन गेले. यासंदर्भात कंपनीच्या मालकाला माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पीरबहोर पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.
या मोबाईल टॉवरची किंमत 8 लाख 32 हजार रुपये इतकी आहे. जीटीएल कंपनीचे मॅनेरजर मोहम्मद शहनवाज अनवर यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. कंपनीने आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. खरं तर हे प्रकरण चार महिन्यांपूर्वीचं आहे. कंपनीच्या अंतर्गत चौकशीमध्ये कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने कंपनीने आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.
जीटीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 रोजी या मोबाईल टॉवरची तपासणीसाठी दौरा केला असता टॉवर गायब असल्याचं समजलं. पटना पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर आजूबाजूच्या घरांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहे. यापैकी एका सीसीटीव्हीमध्ये चार लोकांनी हा टॉवर डिस्मेंटल केल्याचं दिसत आहे. या प्रकरणाचा शोध घेत आरोपींना पकडणं पोलिसांसाठी कठीण असेल असं सांगितलं जात आहे. चोरीला चार महिन्यांचा कालावधी उटलून गेला असल्याने चोरांचा शोध घेणं पोलिसांना आव्हानात्मक असेल.
अशाप्रकारे काही महिन्यांपूर्व गर्दनी बाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत राजपूतानामधूनही मोबाईल टॉवर चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या टॉवरची किंमत 19 लाख इतकी होती.