भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू नाहीत, आमचा हिस्सा बरोबरीचा- ओवैसी

देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे.

Updated: Jun 1, 2019, 10:25 AM IST
भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू नाहीत, आमचा हिस्सा बरोबरीचा- ओवैसी

नवी दिल्ली: भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू म्हणून राहत नाही, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा मुस्लिमांच्या हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील. 

भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले. 

ओवैसी यांनी नुकताच लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणायची भाषा करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर निशाणा साधला होता. तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या जोडप्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्याला ओवैसी यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेता कामा नये. रामदेव बाबा आपल्या पोटासोबत काही करू शकतात, आपले पाय कसेही फिरवू शकतात. याचा अर्थ हा नाही की, फक्त तिसरे अपत्य असल्यामुळे नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क गमवावा, असा टोला ओवैसी यांनी लगावला होता.