नवी दिल्ली : काँग्रेसच्या अधिवेशनात माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधले मंत्री नवजोतसिंग सिद्धूनी जोरदार बॅटिंग केली. भर कार्यक्रमामध्ये नवजोतसिंग सिद्धूनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाय धरून माफी मागितली. मला तुम्हाला ओळखायला १० वर्ष लागली. मी तुमची माफी मागतो. तुमच्या पाया पडल्यामुळे मला गंगेत स्नान केल्याचं पुण्य मिळाल्याचं सिद्धू म्हणाले. तुम्ही सरदार आहात आणि असरदारही आहात, असं कौतुक सिद्धूनी केलं.
तुमच्या मौनानं जे केलं ते भाजपचा आरडाओरडा करु शकलं नाही. ही गोष्ट लक्षात यायला मला १० वर्ष लागली, अशी प्रतिक्रिया सिद्धूनी दिली आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात बहुतेक वक्त्यांना बोलायला ३ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण सिद्धू २० मिनिटं बोलतच राहिले.
या भाषणामध्ये सिद्धूनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसमध्ये माझी घरवापसी झाली आहे, असं सिद्धू म्हणाले. तसंच आपल्या भाषणात सिद्धूनी सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि राहुल गांधींचं कौतुक केलं. पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून राहुल गांधी तिरंगा फडकवतील, असा विश्वास सिद्धूनी व्यक्त केला.