नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेना सुरु करुन प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची योजना सुरु केली आहे. या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर ३१ मेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँकेत ३४२ रुपये ठेवणं आवश्यक आहे. या दोन्ही विम्यासाठी तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला बँकेत ३४२ रुपये ठेवावे लागतील. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजेनेचा प्रिमियम मे महिन्याच्या शेवटी जातो. जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम ३३० रुपये एवढा आहे. तर सुरक्षा विमा योजनेचा प्रिमियम १२ रुपये आहे. या दोन्ही विम्यांचा प्रिमियम ३४२ रुपये एवढा आहे. मे महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात एवढा बॅलन्स नसेल तर तुमचा विमा रद्द होणार आहे. या दोन्ही विम्याचं सुरक्षा कवच ४ लाख रुपये एवढं आहे.
या दोन्ही इन्श्यूरन्सचं मे महिन्यामध्ये नुतनीकरण करावं लागतं. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम ३३० रुपये एवढा आहे. या योजनेचा १८ वर्ष ते ५० वर्षांच्या नागरिकांना लाभ मिळतो. बँक खात्याच्या माध्यमातून या योजनेला लिंक केलं जातं. या योजनेतून विमा धारक व्यक्तीला ५५ वर्षांचं कव्हर मिळतं. कव्हर पूर्ण व्हायच्या आधी जर विमा धारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला २ लाख रुपयांपर्यंतचा कव्हर मिळतो.
अकाऊंट बॅलन्स नसेल तर विमा रद्द होईल
बँक अकाऊंट बंद असेल तरीही विमा रद्द होईल
एकच बँक अकाऊंट या योजनेसाठी जोडलं जाऊ शकतं
प्रिमियम जमा केला नाही तर विम्याचं नुतनीकरण होणार नाही
या योजनेचा लाभ १८ ते ७० वर्षांपर्यंतचे नागरिक घेऊ शकतात. या योजनेचा वार्षिक प्रिमियम फक्त १२ रुपये आहे. या योजनेचा प्रिमियम बँक खात्यामधून जातो. ही योजना घेताना कोणत्याही एका बँक खात्याला योजनेशी लिंक करावं लागतं. या योजनेअंतर्गत विमा धारकाचा अपघातात मृत्यू झाला किंवा विमा धारक अपंग झाला तर २ लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. या योजनेचा प्रिमियम जमा करून कधीही विमा घेता येतो पण मे महिन्याच्या शेवटी बँक खात्यात आवश्यक तेवढा बॅलन्स नसेल तर मात्र हा विमा रद्द होतो.
कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही ही योजना घेऊ शकता. विमा एजंट, सरकारी विमा कंपनी आणि अनेक खासगी विमा कंपन्याही या योजना नागरिकांना देऊ शकतात.