नवी दिल्ली : निर्भया प्रकरणी दोषींची फाशी न्यायालयाच्या आगामी निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पटियाला कोर्टाचे न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी फाशी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पत्र तिहार तुरूंग प्रशासनाकडे पाठवण्यात आलं आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती.
याआधी निर्भया प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. पण या प्रकरणाला आता सतत तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अरोपींना नक्की फाशी देणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी अत्याचार केले होते. या अमानुष कृत्यानंतर बसमधून पीडितेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.