नवी दिल्ली : निर्भयाच्या चारही दोषींना आज पहाटे साडेपाचला फाशी देण्यात आली. पवन, अक्षय, मुकेश आणि विनयला फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई ज्या आशादेवी सोसायटीत राहते, तिकडे गर्दी झाली. यानंतर आशादेवी या बिल्डिंगच्या खाली आल्या.
फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या, 'मी मुलीचा फोटो गळ्याला लावला आणि म्हटलं, बेटा तुला आज न्याय मिळाला, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. आज जर ती या जगात राहिली असती, तर मी एका डॉक्टरची आई म्हटली गेली असती'.
मीडियाशी बोलताना आशादेवी या भावूक झाल्या होत्या. आशादेवी म्हणाल्या, 'मी देशभरातील महिलांना अपिल करतो, देशातील सर्व कुणाच्याही मुलीसोबत अन्याय होत असेल, तर अन्यायाशी लढताना त्यांना जरूर साथ द्या.'
आशादेवी पुढे बोलताना म्हणाल्या, 'देशातील मुलींसाठी माझा संघर्ष सुरूच असणार आहे, मी पुढेही हा लढा सुरू ठेवणार आहे, आजपासून देशातील मुली स्वत:ला सुरक्षित वातावरणात आहोत असं समजतील.'
निर्भयाची आई म्हणाली, हे पहिल्यांदा होत आहे, जेव्हा ४ दोषींना एकाच वेळेस फाशीवर लटकवण्यात आलं आहे. माझ्या मुलीला उशीरा का असेना पण न्याय मिळाला आहे.
आज देशातील मुलींना न्याय मिळाला आहे. देशातील न्यायव्यवस्थेचे मी आभार मानते, त्यांनी दोषींच्या सर्व प्रकारच्या युक्तिवादाला अभय दिला नाही.