नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार केंद्रात पुन्हा एकदा बहुमताने मोदी सरकार येण्याची शक्यता आहे. हे अंदाज जाहीर झाल्यानंतर आता विरोधकांच्या रणनीतीमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेची गणिते जुळवण्यासाठी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटीही सुरु झाल्या होत्या. मात्र, एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर विरोधकांचे मनसुबे पार धुळीला मिळाल्याचे दिसत आहे. परंतु, ही अंदाजित आकडेवारी असल्याने विरोधकांच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
मात्र, आता नाईलाजाने का होईना विरोधकांनी आपली रणनीती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच्या सत्तास्थापनेसाठी सोमवारी 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार होत्या. मात्र, सोमवारी 'बसपा'कडून ही भेट आता रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच येत्या २१ तारखेला सर्वपक्षीय विरोधकांची होणारी बैठकही २४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
BSP leader SC Mishra to ANI: Mayawati ji has no programme or meetings scheduled in Delhi today, she will be in Lucknow. (File pic: Mayawati) pic.twitter.com/SRtTsqX3W0
— ANI UP (@ANINewsUP) May 20, 2019
तत्पूर्वी एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी शनिवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. तर रविवारी ते शरद पवार यांनाही भेटले. या सगळ्यामुळे राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नांना वेग येईल, असे मानले जात होते. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीने या सगळ्यावर पाणी फेरले आहे.
देशातील प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
* टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४
* इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७
* रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’चा आहे. त्यानुसार
रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७
* एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५
* आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस – ८० एनडीए- २८७
* नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६
* न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२
* एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजप – २१८, काँग्रेस ८१)