पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना 7 वर्षांची शिक्षा

या निर्णयानंतर वातावरण चिघळू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

Updated: Dec 24, 2018, 03:55 PM IST
पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना 7 वर्षांची शिक्षा title=

कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात त्यांच्या विरुद्ध सुरु असलेल्या प्रकरणांचा निकाल लागला आहे. यामध्ये नवाज यांना साधारण 14 वर्षांचा तुरूंगवास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. हा निकाल नुकताच आला असून त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, नवाज शरीफ यांनी याआधी देखील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पंतप्रधान पदावरून हटवले होते. फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी पुराव्या अभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

नवाज शरीफ यांच्यावरील सुनावलेल्या निर्णयानंतर न्यायालयाबाहेर मोठा गोंधळ झाला होता.  नवाज शरीफ यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. 

न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक हे आज फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल-अजीजिया प्रकरणी निर्णय सुनावणार आहेत. हा निर्णय लागण्याआधीच नवाज शरीफ रविवारी इस्लामाबादला पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्यावर सुरू असलेल्या प्रकरणी निर्णय सुनावण्यासाठी सोमवार पर्यंतची डेडलाईन दिली होती.

पोलीस बंदोबस्त 

या निर्णयानंतर वातावरण चिघळू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. निर्णयाची तारीख एक आठवडा पुढे ढकलावी अशी मागणी नवाज शरीफ यांच्या वकिलांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात केली होती. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला.

निर्णयाची वेळ

एवनफील्ड प्रोपर्टी केस, फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट केस आणि अल-जजीजिया केस 2017 मध्ये उघड झाली होती. सुप्रीम कोर्टने याप्रकरणाची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करण्यास सांगितली होती. सलग सुरू असलेल्या अपीलांनंतर आज याप्रकरणी निर्णयाची वेळ आली आहे. एवनफील्ड प्रोपर्टी प्रकरणात जुलैमध्ये नवाज शरीफ यांना 11 वर्षे, त्यांची मुलगी मरियम शरीफला 8 वर्षांची आणि जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. 

नवाज शरीफ यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे ते काही काळ पॅरोलवर बाहेर आले होते. पाकिस्तानात याचवर्षी झालेल्या सर्वसाधारण निवडणूकीआधी नवाज शरीफ लंडनहून पाकिस्तानात परत आले आणि समर्पण केले होते.