Pakistan Is Enemy For BJP But For Us...: कर्नाटक काँग्रसचे वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान हा भारतीय जनता पार्टीसाठी शत्रूराष्ट्र असू शकतो. मात्र काँग्रेससाठी पाकिस्तान हा केवळ एक शेजारी देश आहे. या विधानावरुन भाजपाने काँग्रेसकडून राष्ट्राविरोधातील भावनांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटमधील राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पार्टीने केला. याच आरोपांना उत्तर देताना हरिप्रसाद यांनी हे विधान केलं.
आमदारांच्या बैठकीमध्ये हरिप्रसाद यांनी, "शत्रूराष्ट्राबरोबर आमचे संबंध असल्याचा दावा विरोधक करत आहेत. त्यांच्या भूमिकेनुसार पाकिस्तान एक शत्रू राष्ट्र आहे. मात्र आमच्यासाठी पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही. हा आमचा शेजारी देश आहे. मात्र ते पाकिस्तानला आपला शत्रू मानतात," असं म्हटलं. पुढे बोलताना हरिप्रसाद यांनी थेट अडवणींचा उल्लेख केला. "नुकताच त्यांनी अडवणींना भारतरत्न दिला. अडवाणींनी लाहोरमध्ये जिन्नांच्या कबरीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसारखा धर्मनिरपेक्ष इतर कोणताही देश नाही असं म्हटलं होतं. त्यावेळेस पाकिस्तान शत्रूराष्ट्र नव्हता का?" असा सवाल हरिप्रसाद यांनी विचारला.
पाकिस्तान शत्रूराष्ट्र नसल्याचं म्हणणाऱ्या काँग्रेसवर कर्नाटक भाजपाने निशाणा साधला आहे. पाकिस्तानने चारवेळा भारताविरुद्ध युद्ध केलं आहे, अशी आठवण भाजपाने करुन दिली आहे. पाकिस्तानसंदर्भात काँग्रेसची भूमिका आणि सध्या परिस्थिती काय आहे याचा अंदाज हरिप्रसाद यांच्या विधानावरुन येत आहे, असा टोला कर्नाटक भाजपाचे त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन लगावला आहे. त्यांनी पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र असून काँग्रेससाठी मात्र केवळ शेजारी देश असल्याचं म्हटलं आहे. यावरुन पंडित जवाहरलाल नेहरु आणि मोहम्मद अली जिन्नांमधील दृढ संबंध सध्याच्या पिढीपर्यंत कायम असल्याचा आरोप कर्नाटक भाजपाने केला आहे.
भाजपाने केलेल्या आरोपांनुसार मंगळवारी कर्नाटक राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसैन यांच्या विजयानंतर समर्थकांना 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. याविरोधात भाजपाच्या आमदारांना विधानसभेच्या वेलमध्ये उतरुन आंदोलन केलं होतं. या घोषणा देण्यावरुन बराच गोंधळ कर्नाटकच्या विधानसभेमध्ये झाला होता. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. आता हरिप्रसाद यांनी पुन्हा पाकिस्तान प्रकरणावर भाष्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं असून भाजपाने याविषयावरुन काँग्रेसला घेरण्यास सुरुवात केली आहे.