नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली.
गोव्याचे उदाहरण देत पीएम मोदींनी काँग्रेसला घेरले. मोदी म्हणाले, 'सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती तयार केली असती, तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्याला 15 वर्षे गुलामीत राहावे लागले नसते. नेहरूंना आपल्या प्रतिमेची काळजी होती आणि गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मी सैन्य पाठवणार नाही असे सांगितले होते. काँग्रेसने गोव्यासोबत हा अत्याचार केला. पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या 15 ऑगस्टच्या भाषणाचाही उल्लेख केला.
हे वर्ष गोव्यासाठी महत्वाचे आहे. गोवा मुक्तीला आता 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी हैद्राबाद मुक्त केला. सरदार पटेल यांच्या रणनीती नुसार काम केले असते तर गोव्याला स्वातंत्र्यानंतरही 15 वर्षे गुलामीत राहावे लागले नसते. असेदेखील मोदी यांनी म्हटले.
त्यावेळच्या वृत्तपत्रांनुसार, तेव्हाचे पंतप्रधान नेहरू यांना गोव्यापेक्षा आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त काळजी होती. त्यामुळे गोव्याच्या परदेशी सरकारवर आक्रमण केल्याने आपली आंतरराष्ट्रीय शांतीची प्रतिमा मलीन होऊ शकते. म्हणून त्यांनी गोव्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडले.
गोव्यात सत्याग्रहींवर ज्यावेळी परकीय सरकारने गोळीबार केला. त्यावेळी देखील आपल्या पंडित नेहरू यांनी सत्याग्रहींची मदत केली नव्हती. सैन्य पाठवण्यास विरोध केला होता. असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
गोवा मुक्ती संग्रामाविषयी बोलतांना नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्या एका भाषणाची आठवण करून दिली. नेहरू यांनी लाल किल्यावरून 15 ऑगस्टला म्हटले होते की, कोणीही अशा विचारात राहू नये की, आम्ही गोव्याच्या आजुबाजूला फौजा दाखल करू.
आतील लोकांना असे वाटते की, गोंधळ निर्माण करून फौजा दाखल होतील. परंतू आम्ही फौजा पाठवणार नाही. आम्ही हा प्रश्न शांतीने सोडवू.
जे लोक गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह करीत आहेत. त्यांना शुभेच्छा. परंतू त्यांनी हे देखील लक्षात ठेवावं की, सत्याग्रही स्वतःला म्हणत असतील तर, त्यांनी सत्याग्रहींच्या तत्वांचे आचरण करावे, सत्याग्रहीच्या मागे फौजा उभ्या राहणार नाही. असेदेखील नेहरू यांनी म्हटले होते.
नेहरू यांनी गोव्यातील जनतेला त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. गोव्याची जनता कॉंग्रेसच्या वागणूकीला कधीही विसरू शकत नाही. अशी टीकादेखील मोदी यांनी केली.