जयपूर : पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेवबाबा यांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आणि प्राणिजन्य पदार्थ आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
राजस्थानच्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रामदेवबाबांनी याचिका दाखल केली आहे. मात्र रामदेव बाबांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अजमेर येथील एस.के. सिंह यांनी पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा असल्याचा दावा केला होता. या बिस्किटांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यात मैद्यासह प्राणीजन्य पदार्थही आढळले आहेत. मात्र पतंजलीची बिस्किटे मैदाविरहीत असल्याची जाहिरात करण्यात येते.
जयपूरच्या जालूपुरा पोलीस ठाण्यात पतंजलीचे प्रमुख रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण, बिस्किटांची जाहिरात करणाऱ्या आस्था वाहिनीसह इतर वाहिन्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कलम ४२० आणि १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बिस्किटांमध्ये मैदा नसल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
रामदेवबाबा यांनी सर्व आरोप फेटाळले असून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. तर याप्रकरणी न्यायालयाने तक्रारदार आणि राजस्थान सरकार यांना नोटिसा पाठवून उत्तर मागवले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी २० मार्चपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. न्यायाधीश दीपक माहेश्वरी यांनी हे आदेश दिले आहेत.
पतंजलीच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. पतंजलीचे तूपही लोकप्रिय झाले होते. मात्र अन्न आणि औषध विभागाने या तुपाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या पतंजलीच्या उत्पादनांवर या तक्रारीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधी नेस्लेच्या मॅगीवरही बंदी घालण्यात आली होती.
याआधीही रामदेवबाबांच्या आयुर्वेदिक औषधांबाबतही तक्रार दाखल करण्यात आली होती. या औषधांमध्ये प्राण्यांच्या अस्थींचे चूर्ण वापरण्यात येत असल्याचा आरोप होत होता. मात्र रामदेवबाबांनी हे आरोप फेटाळून लावले होते.