नवी दिल्ली : कालच अर्थसंकल्प २०१८ जाहिर झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सरकारने एअर इंडियाची खाजगीकरण प्रक्रिया या वर्ष अखेरीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. नागर विमानन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, कर्जात बुडालेली एअर इंडिया कंपनी चार वेगवेगळ्या युनिट्समध्ये विक्रीसाठी सादर केली जाईल.
जयंत सिन्हा यांनी सांगितले की, काही दिवसांनी याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येईल. यासाठी एक ब्युरो असेल. कोणत्या गोष्टींवर बोली लावली जाईल, कोणत्या वस्तू विकल्या जातील आणि कोणत्या सरकारजवळ राहतील, हे सांगण्यात येईल.
खरेदी करणारी कंपनी जूनच्या अखेरपर्यंत समोर येईल. कायदेशीररीत्या ही प्रक्रिया वर्षअखेरीसपर्यंत पूर्ण होईल. सर्व कायदेशीर करार, सुरक्षा मंजूरी, संपत्तीचे स्थानांतरण, मालकी हक्क या गोष्टी पूर्ण केल्या जातील. मग एअर इंडियावर इतर कोणाचातरी हक्क असेल.
एअर इंडियाच्या निर्गुंतवणूकसाठी इंडिगो तसेच एका परदेशी एअरलाईनने इंटरेस्ट दाखवला आहे. मात्र त्या कंपनीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाचे खाजगीकरण म्हणजे याचा ५१% हिस्साचे खाजगीकरण करण्यात येईल. याचे नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे स्थलांतरीत करण्यात येईल. याचा अर्थ सरकारकडे ४९% हुन कमी अधिकार राहील.
एअर इंडियाची बाजारात भागीदारी १४% आहे. याचे कर्ज ५०,००० कोटी रुपये आहे.