PM Modi On Nagaland, Tripura, Meghalaya Results: त्रिपुरा (Tripura), नागालँड (Nagaland) आणि मेघालयमधील (Meghalaya) विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) मुख्य कार्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना देताना, "पंतप्रधानांनी ईशान्येमधील त्रिपुरामध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठीच्या मोहिमेचं नेतृत्व केलं. नागालँडमध्ये भाजपाला यशही मोदींनीच मिळवून दिलं. तर मेघालयमध्ये भाजपाच्या मतांच्या टक्केवारी झालेली वाढही मोदींमुळे शक्य झाली. यासाठी मी लाखो कार्यकर्ते आणि या विजयासाठी काम करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो," असं म्हणाले. "पंतप्रधान मोदींनी 50 हून अधिक वेळा ईशान्य भारताचे दौरे केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण नागालँडमध्येही यश मिळवत आहोत. त्यांनी पूर्वेकडील राज्यांवर जास्त लक्ष देण्याचं धोरण स्वीकारलं. ईशान्य भारतामधील या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने मी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतो," असंही नड्डा म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ईशान्य बारतामधील जनतेचे विशेष आभर मानले. "सर्वात आधी ईशान्य भारतातील सर्व नागरिकांच्या सन्मानार्थ आपआपले मोबाईल काढून फ्लॅश लाइट सुरु करुन अनोख्या पद्धतीनं त्यांचं अभिनंदन करुयात," असं मोदींनी म्हणता सर्व उपस्थितांनी आपल्या मोबाईलची फ्लॅश लाइट लावून भाजपाच्या विजयासंदर्भातील घोषणाबाजी केली.
आपने जो मोबाइल फोन के माध्यम से प्रकाश फैलाया है,
ये पूर्वोत्तर के नागरिकों का सम्मान है,
पूर्वोत्तर के देशभक्ति का सम्मान है,
प्रगति के रास्ते पर जाने का सम्मान है।
ये प्रकाश उनके सम्मान में है, उनके गौरव में है। आप सभी का मैं धन्यवाद करता हूं।
- पीएम @narendramodi pic.twitter.com/MIyJI06Z8R
— BJP (@BJP4India) March 2, 2023
"मी नतमस्तक होऊन ईशान्य भारतातील नागरिकांचे आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तेथील कार्यकर्ते हे आमच्यापेक्षा अधिक मेहनत घेत आहेत, त्यामुळेच मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आजचे निकाल हे देशाबरोबर जगभरातील लोकांसाठी संदेश आहे. भारतामध्ये आजही लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि लोकशाही किती सक्षम आहे हे दर्शवणारे आजचे निकाल आहेत," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
"मागील काही वर्षांमध्ये भाजपाचं हे मुख्य कार्यालय अशा अनेक कार्यक्रमांचं साक्षीदार राहिलं आहे. आज आम्हाला जनतेला विनम्रतेने अभिवादन करण्याची आणखीन एक संधी मिळाली. मी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या जनतेचे आभार मानतो. मी नतमस्तक होऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो. या राज्यातील जनतेचे आमच्या सहकाऱ्यांना भरपूर आशिर्वाद दिले आहेत. दिल्लीत काम करणं भाजपासाठी कठीण नाही. मात्र ईशान्य भारतामध्ये आमचे कार्यकर्ते दुप्पट मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीचं मी कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो," असं म्हणत मोदींनी या तिन्ही राज्यांमधील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
"निवडणूक जिंकण्यापेक्षा या गोष्टीचं जास्त समाधान आहे की मी वारंवार तिथे जाऊन तेथील लोकांची मनं जिंकली. ईशान्येकडील लोकांना असं हे समजलं आहे की त्यांच्याकडे दूर्लक्ष केलं जात नाही. आता ईशान्य भारत दिल्लीपासूनही दूर नाही आणि मनानेही दूर नाही," असं मोदींनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान भाजपाला वारंवार मिळत असलेल्या विजयामागील गुपितही सांगितलं. मोदींनी भाजपाच्या विजयाचं रहस्य सांगताना, "काही विशेष हितचिंतकांना विचार करुन करुन पोटात दुखायला लागलं आहे की भाजपाच्या विजयाचं रहस्य काय आहे. भाजपाच्या विजयाचं रहस्य लपलं आहे त्रिवेणी शक्तीमध्ये. यापैकी पहिली शक्ती भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये सरकारांनी केलेली कामं, दुसरी शक्ती भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधील सरकारांची कम करण्याची पद्धत आणि तिसरी शक्ती भाजपा कार्यकर्त्यांचा सेवाभाव," असं म्हटलं.
ईशान्य भारतामधील विजयानंतर मोदींनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. "काँग्रेसने छोट्या राज्यांविरोधात आपल्या मनातील द्वेष जाहीरपणे सांगितला आहे. त्यांचं नेतृत्व म्हणतं की ही तर छोटी राज्यं आहेत, ही फार महत्त्वाची नाहीत. अशाप्रकारे या राज्यांकडे तिरस्काराने पाहून काँग्रेस मोठी चूक करत आहे. याच विचारांमुळे छोट्या राज्यांना, गरीब आदिवासी लोकांना दूर्लक्षित करण्यात आलं. छोट्या राज्यांमधील लोकांबद्दल असलेला हा काँग्रेसचा द्वेषभाव येणाऱ्या निवडणुकींमध्ये पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार आहे," असा टोला मोदींनी लगावला.