PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान (Hossein Amirabdollahian) यांच्या हेलिकॉप्टरची इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात हार्ड लँडिंग झाल्याची माहिती इराणच्या माध्यमांनी दिली आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी या वृत्ताची पुष्टी केलीये. हेलिकॉप्टरने पूर्व अझरबैजानमधील तेहरानपासून सुमारे 600 किमी दूर असलेल्या जोल्फामध्ये हार्ड लँडिंग केलं. तेव्हापासून राष्ट्राध्यक्ष बेपत्ता असल्याची माहिती मिळतीये. त्यामुळे आता सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे.
इराणच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे; पण दाट धुक्यामुळे अडचणी येत आहेत. डोंगराळ भागात हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केले. हे ठिकाण ताब्रिझ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. अशातच मोदींनी आम्ही इराणी लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत, असं ट्विट केलंय.
काय म्हणाले पीएम मोदी?
आज राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणासंबंधीच्या बातम्यांमुळे चिंतेत आहे. या संकटाच्या वेळी आम्ही इराणी लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि राष्ट्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Deeply concerned by reports regarding President Raisi’s helicopter flight today. We stand in solidarity with the Iranian people in this hour of distress, and pray for well being of the President and his entourage.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2024
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बोलवली तातडीची बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. इराणमधील परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शोध मोहिमेत इराकने मदत देऊ केली आहे. तर आम्हाला आशा आहे की राष्ट्राध्यक्ष सुखरूप परततील, असं इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी म्हटलं आहे. आज इराणचे राष्ट्राध्यक्ष आर्मेनियाला भेट देणार होते. इराणने युरोपियन युनियन कंपनीकडे सॅटेलाईट इमेजची मदत मागितली आहे.
मागील महिन्यात म्हणजेच 13 एप्रिलला इराणने भारतात येणारे मालवाहू जहाज एमएससी एरीज ताब्यात घेतलं होतं. या जहाजामध्ये चालक पथकासह 25 सदस्य होते. यात 17 भारतीय होते. 12 भारतीयांची आधीच सुटका झाली होती. पाच भारतीय इराणने आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यानंतर आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री एच अमीर अब्दुल्लाहियन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.