राहुल गांधी कैलास-मानसरोवर यात्रेवर, गिरिराज म्हणतात 'फेक फोटो'

 राहुल गांधी या यात्रेत इतर यात्रेकरुंची भेट घेतानाही दिसत आहेत.

Updated: Sep 7, 2018, 12:35 PM IST
राहुल गांधी कैलास-मानसरोवर यात्रेवर, गिरिराज म्हणतात 'फेक फोटो' title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर आहेत. राहुल गांधींचे या यात्रेचे काही फोटो सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. आज राहुल गांधी यांनी स्वत:ही एक व्हिडिओ शेअर केलाय. स्वत:ला शिवभक्त सांगणाऱ्या राहुल यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'शिवच विश्व आहे' असं म्हटलंय. 

सोशल मीडियावर दिसणाऱ्या या फोटोंत टोपी, चश्मा, जीन्स, जॅकेट अशा पेहरावात दिसणारे राहुल गांधी या यात्रेत इतर यात्रेकरुंची भेट घेतानाही दिसत आहेत.

पण, भाजप नेत्यांना राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी सोडण्याची इच्छा नाही. त्यांच्याकडून राहुल गांधींचे हे फोटो एडिटेड असल्याचं सांगण्यात येतंय. 

'कैलासाकडून बोलावणं येतं तेव्हा व्यक्ती इथं पोहचतो... मला ही संधी मिळालीय म्हणून मी खूप खुश आहे. मी इथे जे पाहिलं ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन' असं राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर म्हटलं होतं. 

काँग्रेस अध्यक्ष 31 ऑगस्टच्या रात्री कैलास मानसरोवरच्या यात्रेसाठी निघालेत. नेपाळमार्गे ते मानसरोवर गेलेत. त्यांची ही एकूण 12 दिवसांची यात्रा आहे. “ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतम् गमय, ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:” या श्लोकासहीत त्यांनी आपल्या यात्रेची सुरुवात सोशल मीडियावर शेअर केली होती. 
 

धार्मिक मान्यतेनुसार, हे स्थान 12 ज्योतिर्लिंगापैंकी सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तब्बल 22,028 फूट उंच बर्फाच्छादित कैलास पर्वताजवळ असणाऱ्या मानसरोवराला कैलास मानसरोवर तीर्थ म्हटलं जातंय.