नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्या मुलाला शिकवले की, हार कधी मानायची नाही, याच विश्वासावर माझा मुलगा आज पायलट झालाय, असे कौतुकाचे उद्गार काढत निर्भयाची आई आशा देवी यांनी राहुल यांचे आभार मानले.
दिल्लीत २०१२ मधील त्या घटनेचा आजही त्रास होत आहे. ही कटू आठवण अजूनही देशवासीयांच्या मनात कायम घर करुन राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. अगदी संयुक्त राष्ट्रातदेखील निर्भया प्रकरणाची चर्चा झाली होती. २०१२मधील घटनेचा माझ्या मुलावर मोठा आघात झाला. निराश झालेल्या माझ्या मुलाला पायलयचे प्रशिक्षण घेण्यासाठी राहुल गांधी यांनी मोठा भावनिक आधार दिला. त्यामुळे आज मुलगा पायलट झालाय, अशी माहिती आशा देवी यांनी सांगितली.
२०१३ मध्ये सीबीएसईची परीक्षा दिल्यानंतर माझा मुलगा सागरने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान उड्डाण अकादमीत प्रवेश घेतला. त्याच्या राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा सर्व खर्च राहुल गांधी यांनी केला. प्रशिक्षणाच्या १८ महिन्यांच्या कालावधीत सागर निर्भया प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती फोनवरुन घ्यायचा. माझ्या मुलाची काळजी राहुल गांधींसह प्रियांका गांधी यांनी घेतली. ते नेहमी मुलाच्या संपर्कात होत्या, असेही आशा देवी म्हणाल्या. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भावना व्यक्त केली.
दिल्लीतील त्या घटनेनंतर आमच्यावर मोठा डोंगर कोसळला होता. जणू काही आयुष्य संपून गेले आहे, अशी भावना मनात येत होती. मात्र या परिस्थितीतही मुलगा अभ्यास करत होता. त्याने अजिबात लक्ष विचलित होऊ दिले नाही. घरातील परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही त्याने अभ्यास केला. त्याला लष्करात जायचे आहे, हे राहुल गांधींना समजल्यावर त्यांनी त्याला पायलटचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला, अशी आठवण निर्भयाच्या आई आशा देवी यांनी सांगितली. १६ डिसेंबरला २०१२ ला दक्षिण दिल्लीत निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. सर्वोच्च न्यायालयाने ४ दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली.