नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष पद सोडल्यानंतर आणि अमेठीतील पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आज बुधवारी अमेठीत जाणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी एक दिवसांच्या दौऱ्यावर अमेठीत जात आहेत. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा याही अमेठी दौऱ्यावर असू शकतात. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल अमेठीतील गौरीगंज (जिल्हा मुख्यालय) येथे कार्यकर्त्यांना भेटतील आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करतील. त्यानंतर, ते सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतील.
लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी हे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृति ईरानी यांच्याकडून ५५ हजार मतांनी पराभूत झालेत. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.
काँग्रेस आमदार पार्षद दीपक सिंग म्हणाले, राहुल यांचे नेहमीच अमेठीसोबत एक कौटुंबीक वातावरण राहिले आहे. ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला येत आहेत. राहुल यांच्या दौऱ्याचा उद्देश हा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा असेल.
दरम्यान, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल अमेठीत के. एल. शर्मा यांना पुन्हा प्रभारी म्हणून नियुक्त करतील. तर प्रियंका गांधी वाड्रा यांनी गेल्या महिन्यात रायबरेली मतदारांना धन्यवाद देण्यासाठी आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत दौरा केला होता. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर राग व्यक्त केला होता. अनेकांनी काम केले नाही, असा आपला रागही बोलून दाखवला.
दरम्यान, राहुल गांधी २००४ पासून अमेठीचे नेतृत्व करीत आहेत. तीन वेळा ते लोकसभेवर गेले आहेत. यावेळी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. ती म्हणजे सोनिया गांधी रायबरेली येथून निवडून आल्यात.