वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत आल्यापासूनच प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान वंदे भारत सेवेत आल्यानंतर स्लीपर कोचची मागणी केली जात होती. त्यानंतर रेल्वेने वंदे भारत स्लीपर व्हर्जनही येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या स्लीपर एक्स्प्रेसच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीत डब्यांची निर्मिती केली जात आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा मिळणार आहेत. 160 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन फक्त 50 सेकंदात 100 किमी ताशी वेगाने धावण्यात सक्षम आहे.
विशेष बाब म्हणजे, वंदे भारत चेअरकारच्या डिझाइनचे जनक एस श्रीनिवास यांच्याकडेच स्लीपर ट्रेनचे डबे तयार करण्याची जबाबदारी आहे. एस श्रीनिवास सध्या रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला येथे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
आरसीएफने पहिल्यांदाच वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर व्हर्जनच्या 16 ट्रेनची निर्मिती सुरु केली आहे. पुढील आर्थिक वर्षात पहिली ट्रेन धावण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एस. श्रीनिवास हे आयसीएफ चेन्नईमध्ये मुख्य डिझाइन अभियंता (CDE) म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे भारत चेअरकारची रचना तयार करण्यात आली होती.
एस. श्रीनिवास यांनी सांगितलं आहे की, इंजिनिअर्सनी डिझाइनची योजना पूर्ण केली आहे. डब्यांचे भाग आणि उपकरणं खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. वंदे भारत ट्रेनच्या नवीन स्लीपर व्हर्जन कोचच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी सांगितलं आहे की, त्याचा आतील भाग विमानासारखा असेल. लाइटिंगसह इतर सुविधाही विमान प्रवासाप्रमाणे असतील. आपातकालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे चालकाशी बोलण्याची सुविधा मिळेल. विमानाप्रमाणे व्हॅक्यूम स्वच्छतागृहे असतील. मेट्रोप्रमाणेच येथे स्वयंचलित बाह्य दरवाजे आणि सेन्सर दरवाजे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी वाटेल.
एस श्रीनिवास यांनी सांगितलं आहे की, आरसीएफला बांगलादेश रेल्वेसाठी वेगवेगळ्या व्हेरियंटचे 200 कोच निर्यात करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. आरसीएफ लवकरच निर्मिती सुरु करणार आहे. याशिवाय आरसीएफ पुढील वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस मेन लाइन इलेक्ट्रिकल मल्टीपल यूनिट्सचे (एमईएमयू) 41 सेट तयार करणार आहे.
ते म्हणाले की, आरसीएफने 1985 मध्ये स्थापनेपासून आतापर्यंत विविध प्रकारचे 43 हजार डबे तयार केले आहेत. RCF द्वारे निर्मित विस्डम कोचच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून हे डबे लवकरच कालका-शिमला हेरिटेज रेल्वे ट्रॅकवर कार्यान्वित केले जातील.