राज्यसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची बैठक, यांच्या नावाची चर्चा

दिल्लीत भाजप पार्लेमेंटरी बोर्डची आज बैठक. राज्यसभेसाठी यांच्या नावाची चर्चा.

Updated: Mar 10, 2020, 12:48 PM IST
राज्यसभा निवडणूक : दिल्लीत भाजपची बैठक, यांच्या नावाची चर्चा title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : दिल्लीत भाजप पार्लेमेंटरी बोर्डची आज बैठक होत आहे. त्यामध्ये राज्यसभेचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले, एकनाथ खडसे, रामदास आठवले, सुरेश हावरे यांची नावे भाजपकडून राज्यसभेच्या तिकीटासाठी आघाडीवर आहेत. तसेच श्याम जाजू, विजया रहाटकर यांच्यासह अमर साबळे आणि संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत. 

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार जवळपास निश्चत असल्याचे समजते. भाजपचा राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपच्या दिल्लीलीत नेत्यांची गाठीभेटी करत आहेत.

भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून एकनाथ खडसे, सुरेश हावरे यांसह काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भाजपचे दिल्ली नेते याबाबत अंतिम कौल काय देतात हे पाहावे लागेल. राज्यसभेच्या एका जागेसाठी विधानसभेत ३७ आमदारांच्या मतांची गरज आहे. सध्याच्या संख्याबळानुसार भाजप २, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडी यातील इतर सर्व मतांची आकडेवारी लक्षात घेता एक जाागा जिंकण्याचे गणित सध्या दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजप अधिक सतर्क झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांतून राज्यसभा खासदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी राज्यमंत्री फौजिया खान या येत्या अकरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच दिली आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. पुढील दोन दिवसात शिवसेनेचा उमेदवार ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.