रामलल्लासाठी शाळिग्राम शिळाचं का? नेपाळहून अयोध्येत का आल्या शाळिग्राम शिळा?

अयोध्येतल्या भव्यदिव्य राममंदिरातली प्रभूश्रीराम आणि जानकीमातेची मूर्ती दोन भल्यामोठ्या शाळिग्राम शिळांमधून साकारल्या जाणार आहेत, पाहा या शिळांचं महत्त्व

Updated: Feb 2, 2023, 09:53 PM IST
रामलल्लासाठी शाळिग्राम शिळाचं का? नेपाळहून अयोध्येत का आल्या शाळिग्राम शिळा? title=

Ayodhya Ram Mandir : नेपाळहून (Nepal) दोन खास देवशिळा रामजन्मभूमी अयोध्येत (Ayodhya) दाखल झाल्या आहेत. अयोध्येतल्या भव्यदिव्य राममंदिरातली प्रभूश्रीराम आणि जानकीमातेची मूर्ती याच दोन शाळिग्राम शिळांमधून (Shaligram) साकारण्यात येणार आहे. 26 जानेवारीला नेपाळमधून दोन ट्रकमधून निघालेल्या या देवशिळांच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागलीय. कुणी शिळांना स्पर्श करून अभिवादन करतंय, तर कुणी या शिळांवरच माथा टेकतंय. 

याच दोन नेपाळी शिळांमधून प्रभू श्रीराम-जानकी मातेची मूर्ती का साकारण्यात येणार आहेत, या देवशिळांचं ऐतिहासिक आणि पुरातन महत्त्व नेमकं काय आहे, या शिळा का खास आहेत? 

शाळिग्राम शिळांचं महत्त्व काय? 
मिथिला अर्थात नेपाळ ही प्रभू श्रीरामांची सासरवाडी. त्यामुळं राम-सीतेच्या मूर्ती बनवण्यासाठी अर्थातच मिथिलेतल्या शाळिग्राम शिळांची निवड करण्यात आली. नेपाळच्या शालिग्रामी अर्थात बुढी गंडकी नदीतून या शिळा काढण्यात आल्या. एक शिळा 26 टन, दुसरी शिळा 14 टन वजनाची आहे. या शिळा 6 कोटी वर्ष प्राचीन असल्याचा दावा केला जातोय. या शिळेपासून साकारण्यात येणारी बाल स्वरुपातील रामलल्लाची मूर्ती 5 ते 6 फूट उंचीची असेल. रामनवमीला सूर्यकिरण थेट रामलल्लाच्या माथ्यावर पडतील, एवढ्या उंचीच्या मूर्ती घडवल्या जाणार आहेत

शास्त्रांमध्ये शाळीग्रामाचं महत्त्वं काय? 
शास्त्र आणि वेदपुरामणांमध्ये शाळीग्राम शिळा या साक्षात विष्णूचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात या खडकाची पूजाही केली जाते. सहसा ही शिळा उत्तर नेपाळमधील (nepal) गंडकी नदीमध्ये सापडतात. हिमालयातून येणारं पाणी मोठमोठ्या पर्वतांवर आपटून ते खंडीत होतात आणि त्यातूनच हा खडक तयार होतो. अनेक ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी या खडकाचा वापर केला जात. वैज्ञानिक दृष्टीनं पाहायचं झाल्यास हा खडक एक जिवाश्म (Fossil) असून, त्याचे 33 प्रकार आहेत. 

2024 च्या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर अयोध्येतील प्रभूश्रीराम मंदिराचे दरवाजे सामान्य लोकांसाठी खुले होणार आहेत. त्यावेळी शाळिग्राम शिळांमधून साकारलेल्या रामलल्लाचं दर्शन सगळ्यांना होणार आहे.