Red Gold in India: भारतात सोन्याचे भाव दर दिवशी बदलतात आणि ते खरेदी करण्यासाठीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची चिंता वाढवतात किंवा मग कमी करतात. अशा या सोन्याच्या दरांची चिंता होत असतानाच आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आला असून, त्या मुद्द्यानं अनेकांनाच पेचात पाडलं आहे. कारण, एका अहवालातून आणि काही निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातून 'लाल सोनं' नामशेष होण्याच्या मार्गावर चाललं आहे.
जागतिक स्तरावर लाल सोन्याच्या निर्मितीमध्ये भारताचा महत्त्वाचा वाटा आहे. हे 'लाल सोनं' म्हणजे, केशर. जम्मू काश्मीर येथील पंपोरमध्ये जगातील या सर्वात महागड्या मसाल्याचं उत्पादन घेण्यात येतं. जगभरात या केशरची विक्री $1,500 (£1,200) 1,24,950 रुपये इतक्या दरानं केली जात आहे.
पंपोर भागामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वत्र जांभळी छटा पाहायला मिळते. ही छटा असते क्रॉकसच्या फुलांना आलेल्या बहराची. पानझडीच्या ऋतूमध्ये काश्मीरमध्ये या फुलांच्या काढणीचा हंगाम सुरु होतो, ज्याच्या परागांमधून लालसर रंगाचे धागेवजा केशर अर्थात स्टिग्मा तोडले जातात आणि ते वाळवून हाती येतं ते म्हणजे अस्सल केशर, देशातील जवळपास 90 टक्क्यांहून अधिक केशराचे उत्पन्न या काश्मीर प्रांतातूनच केलं जातं.
बीबीसीनं स्थानिक केशर फुलांची शेती करणाऱ्या एका कुटुंबाचा हवाला देत 2 ते 3 लाख फुांच्या माध्यमातून अवघं एक किलो केशर मिळतं असं सांगत केशर फुलांच्या बिया रोवण्यापासून ती फुलं खुडून त्यातून अलगद हातानं केशराच्या काड्या काढण्याची प्रक्रिया अतिशय मोठी असल्याचं स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, तर मागील काही वर्षांमध्ये शेतांची उत्पादकता घटल्याचं दाहक वास्तवही त्यांनी समोर आणलं.
पर्जन्यमानामध्ये सातत्याचा अभाव, तापमानवाढ या साऱ्यामुळं माती कोरडी पडून त्याचा केशरफुलांवर वाईट परिणाम दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वैज्ञानिकांनीही सदर परिस्थितीचा अभ्यास करत केशर उत्पादनात झालेली घट हा गंभीर विषय असल्याची बाब अधोरेखित करत त्यामागील कारणांकडेच लक्ष वेधलं.
वातावरणात होणारे बदल, बर्फवृष्टी आणि पावसाममध्ये नसणारा ताळमेळ या साऱ्यामुळं दहा वर्षांपूर्वी ज्या शेतांतून समाधानकारक केशर उत्पादन घेतलं जात होतं तिथं आता हाती निराशाच येत येत असल्याचं निष्पन्न झालं. सध्याच्या घडीला केशर उत्पादन, शेती, शेतीच्या पद्धती या साऱ्याशी संबंधित अनेक अभ्यासपर निरीक्षणं सुरु असून, या साऱ्याचा आता या केशराच्या उत्पादनावर नेमका किती आणि कुठवर परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अन्यथा केशरही भारतातून इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही हे वास्तव नाकारता येत नाही.