मुंबई : आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. कोणत्या मार्गाने अधिक पैसे कमावता येतील आणि आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवता येईल.. या चिंतेत प्रत्येक व्यक्ती जगत असतो. पण जर का एका रात्रीत तुम्ही मालामाल झालात तर... सगळ्या अडचणी कमी होतील. म्हणतात ना, 'भगवान जब भी देता छप्पर फाड़ कर देता है...', असंच काही झालं आहे केरळमध्ये राहणाऱ्या रिक्षा चालकासोबत (riksha driver). या रिक्षाचालकाला एक दोन लाख नव्हे तर, चक्क 25 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. (riksha driver bumper lottery )
25 कोटी रुपयांची लॉटरी लागलेल्या रिक्षा चालकाचं नाव अनूप असून तो 32 वर्षांचा आहे. अनूपने लॉटरीचं तिकीट तिरुवनंतपुरम येथील पझावंगडी भगवती एजेन्सीतून खरेदी केला. केरळ ओणम बंपर लॉटरीत 25 कोटींचे बक्षीस जिंकणारा हा पहिला रिक्षा चालक आहे. (onam bumper lottery) तर दुसरं बक्षीस 5 कोटी रुपयांचं होतं, जे तिकीट क्रमांक TG 270912 ला मिळालं आहे.
अनूपने ज्या एजन्सीमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं त्या एजन्सीमध्ये उपस्थित असलेल्या माध्यमांना त्याने सांगितलं की T-750605 ही त्याची पहिली पसंती नव्हती . त्याने खरेदी केलेलं पहिलं तिकीट आवडलं नाही म्हणून त्याने दुसरे तिकीट काढले आणि दुसऱ्या तिकीटावर त्याला लॉटरी लागली.
गेल्या 22 वर्षांपासून अनूप लॉटरीची तिकिटे खरेदी करत असून आतापर्यंत 100 किंवा 5 हजार रुपयांपर्यंत त्याला लॉटरी लागली. पण आता 25 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यामुळे तो अत्यंत आनंदी आहे.
अनूप म्हणाला, 'मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिला नाही," तो म्हणाला. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो आहे. माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी तो मेसेज माझ्या पत्नीला दाखवला.'
पुढे अनूप म्हणाला, तरीही मला शंका होती, म्हणून मी लॉटरी विकणाऱ्या महिलेला तिकिटाचा फोटो पाठवला. त्यानंतर त्या महिलीने लॉटरी लागल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे जिंकलेल्या पैशातून कर भरल्यानंतर अनूपला सुमारे 15 कोटी रुपये मिळतील.