अहमदाबाद: दिवाळीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) म्हणून महागड्या भेटी देण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध हिरे व्यावसायिक सावजी ढोलकिया यांनी यंदा मंदीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी ते आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटी देणार नाहीत. त्यामुळे यंदा त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी नेहमीप्रमाणे आनंदाची नसेल.
यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका (फ्लॅट) आणि गाड्या भेट दिल्याने सावजी ढोलकिया प्रचंड चर्चेत आले होते. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या ६०० कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली होती. तर ९०० कर्मचाऱ्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव (एफडी) म्हणून काही रक्कम जमा केली होती.
तत्पूर्वी कंपनीत २५ वर्षे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सावजी ढोलकिया यांनी मर्सिडीज बेन्झही भेट दिली होती.
मात्र, यंदा मंदीच्या परिस्थितीमुळे सावजी ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचे ठरवले आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, यावेळची मंदी ही २००८ पेक्षाही गंभीर आहे. सूरतमधील डायमंड सिटीला याचा मोठा फटका बसला आहे. अशावेळी आम्ही कर्मचाऱ्यांना बोनस कसा देऊ शकतो? गेल्या सात महिन्यांत ४० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एकूणच कंपन्या बिकट परिस्थितीचा सामना करत असल्याचे ढोलकिया यांनी सांगितले.
मोदी सरकारला मोठा झटका, जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर
सूरत डायमंड असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही हिरे व्यवसायाला मंदीचा जबर फटका बसल्याचे मान्य केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरतमधील तब्बल २० टक्के कारखान्यांमधील कामकाज ठप्प झाले आहे. खनिज कंपन्यांनी वाढवलेले दर आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किंमतीत झालेली घसरण यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.