चेन्नई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची आज विविध विषयांवर महाबलीपूरम (Mahabalipuram) इथे आज चर्चा होणार आहे. शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज मोदी आणि जिनपिंग अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर हे दोन नेते यावेळी चर्चा करतील. जिनपिंग आणि मोदी हे व्यापार, दहशतवाद अशा मुद्द्यांवर चर्चा करतील. डोकलाम संघर्षांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चीनमधील वुहान येथे भेट झाली होती त्याचप्रमाणे आता दोन्ही नेते दुसऱ्यांदा काश्मीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी चर्चा करणार आहेत.
आज मोदी आणि जिनपिंग ताज फिशरमन्स कोव्हच्या टँगो हॉलमध्ये भेटणार असून त्यांच्यात व्यापक चर्चा होणार आहे आणि त्यानंतर शिष्टमंडळाच्या स्तरावर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर दोन्ही बाजुंनी स्वतंत्र निवेदनं जारी केली जाणार आहेत. संयुक्त निवेदन जारी करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
आज सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा सुरू होईल. सकाळी १०.५० वाजता दोन्ही देशांच्या प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा होईल. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासाठी दुपारच्या जेवणाचं आयोजन करणार आहेत. दुपारी १२.४५ वाजता राष्ट्रपती शी जिनपिंग चेन्नई विमानतळाकडे रवाना होतील.