Paragliding : देशभरात सध्या थंडीची लाट पसरलीय. त्यामुळे पर्यटकांनी भारताच्या उत्तरेकडील थंड हवेच्या ठिकाणांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांनी त्याला पसंती दिली आहे. ख्रिसमससह नवे वर्ष साजरा करण्यासाठी हजारो पर्यटक हिमाचलमधील विविध पर्यटन ठिकाणी पोहोचले आहेत. मनाली, कुलूमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू-मनाली जिल्ह्यात येणारे पर्यटक बियास नदीत रिव्हर राफ्टिंगला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या आधीच पर्यटकांनी कुल्लू मनालीच्या मैदानात तळ ठोकला आहे. तसेच इथल्या मैदानी भागात पॅराग्लायडिंग सारख्या साहसी खेळांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र हा साहसी खेळ एका पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे.
साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू
रविवारी कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना पडून एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरज शाह असे मृताचे नाव असून तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॅराग्लायडर हवेत असताना त्याचा सुरक्षेसाठी असलेला बेल्ट उघडला आणि त्यामुळे तो उंचीवरुन खाली कोसळला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी सूरज आणि पायलटला कुल्लू येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. तर पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांचे चौकशीचे आदेश
पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. अपघाताच्या कारणाचा आम्ही तपास करत आहेत. अपघाताला जबाबदार असलेल्या कारणाचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304अ अंतर्गत पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला जबाबदार कोण हे तपासानंतरच कळेल, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, याआधी 12 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर जानेवारीमध्ये या भागात मृत्यू झाल्यानंतर जानेवारीमध्ये पॅराग्लायडिंग बंद करण्यात आले होते. यानंतर हिमाचलमधील सर्व साहसी खेळांच्या देखरेखीसाठी उच्च न्यायालयाकडून एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली होती. याच्या तपासातून अनेक पॅराग्लायडिंग करणाऱ्यांची नोंदणीच झाली नसल्याची बाब समोर आली होती. तसेच अनेकांकडील उपकरणे ही योग्य दर्जाची देखील नव्हती. यानंतर त्यानंतर एप्रिलमध्ये सर्व निकषांची पूर्तता करणार्या पॅराग्लायडरलाच पॅराग्लायडिंग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.