Explainer India splitting apart? : भारताचा रक्षक असं वर्णन केल्या जाणाऱ्या हिमालय पर्वत आणि नजीकच्या सर्व पर्वतरांगांनी पुन्हा एकदा भूगर्भशास्त्रज्ञांना हैराण केलं आहे. साऱ्या जगासाठी आकर्षणाचा विषय असणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगांच्या शिखरांवर कितीही सुखद दृश्य दिसत असलं तरीही या पर्वताच्या तळाशी आणि तिथून कैक किमी खोलवर सध्या सुरू असणाऱ्या कैक हालचालींनी चिंता वाढवली आहे.
साधारण 60,000,000 वर्षांपूर्वी (60 मिलियन) पासूनच भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट अतिशय धीम्या गतीनं एकमेकांवर आदळण्यास सुरूवात झाली. यात भूखंड आणि त्याखाली असणाऱ्या थरांच्या एकमेकांवर आदळण्याच्या प्रक्रियेतून हिमालयासम पर्वतरांगांची निर्मिती झाली. नुकत्याच झालेल्या एका निरीक्षणानुसार भारतीय भूखंड ज्या थरावर आहे तो थर दुभंगला जात असून, त्याच्या सर्वात खालील भाग वेगळा होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे.
भूकंपातून निर्माण होणारे तरंग, तिबेटन झऱ्यांपासून निघणाऱ्या वायूचे नमुने यांचा आधार घेत या सिद्धांताचा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये हेलियम आयसोटोप्सनं हे दोन्ही थर वेगळे होत असण्याच्या भागात उष्ण द्रव्याच्या महाकाय खडकांचा जन्म होत असल्याची बाब निदर्शनास आणली. संशोधकांच्या निरीक्षणानुसार या द्रव्यानंच नैसर्गिकरित्या पडणारी भेग भरून निघत आहे.
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भारतीय उपखंड आणि त्याखाली असणाऱ्या अंतर्गत प्लेटनं अनेक हालचाली अनुभवल्या आहेत. हिमालय पर्वतरांगेचा चंद्रकोरेसम दिसणारा आकार हेच सुचवतो. भूतानपाशी असणारा एक महत्त्वाचा भाग भूखंडाच्या अंतर्गत भागात सुरू असणाऱ्या हालचाली अधोरेखित करतो. तर, तिथं दिसणारे Mantle खडक या भेगा भरत असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्याच्या घडीला पृथ्वीच्या आणि विशेष म्हणजे भारतीय भूखंडामध्ये निर्माण होणारे तरंग, अंतर्गत थरांच्या होणाऱ्या हालचाली येत्या काळात त्या - त्या भागांमध्ये भूकंपांवर कशा पद्धतीनं परिणाम करतील याचा अभ्यास संशोधक करत आहेत. या संशोधनातून भविष्यात नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.