Chhaava Screening: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या जबरदस्त अभिनयाने नटलेला 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रेक्षकांनी याला अगदी डोक्यावर घेतलं होतं. सगळीकडेच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई करत आहे. मात्र, गुजरातच्या भरूच शहरात चित्रपट पाहणाऱ्या एका प्रेक्षकाने क्लायमॅक्स सीन पाहून संतापाच्या भरात स्क्रीनच फोडली. पण नेमकं घडलं काय? सविस्तर जाणून घ्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अनेक वादविवादांना सामोर जाऊनही हा चित्रपट तयार करण्यात आला होता. या ऐतिहासिक चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे आणि आतापर्यंत 145 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर महारानी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहे.
छावा चित्रपट पाहण्यासाठी फक्त मराठीच नाही तर अमराठीसुद्धा तेवढीच उत्सुक आहेत. तसेच गुजरातमधील भरूच येथे एका मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. या दरम्यान चित्रपट पाहणाऱ्या जयेश वसावा नावाच्या व्यक्तीला संभाजी महाराजांवर झालेल्या अत्याचारांचे दृश्य पाहणे असह्य झाले. संतापाच्या भरात त्याने थिएटरची स्क्रीनच फोडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पण, या घटनेची चर्चा सगळीकडे होत आहे.
हे ही वाचा: KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...
चित्रपटाच्या एका दृश्यावर वाद निर्माण झाला होता. संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांना राणी येसूबाईसोबत लेझिम खेळताना दाखवण्यात आले होते. या सीनवर काही लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे निर्मात्यांनी तो सीन चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच हटवला.
'छावा'ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भव्य सेट, दमदार अभिनय आणि ऐतिहासिक कथा यामुळे चित्रपटाने रसिकांचे मन जिंकले आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा सांगतो आणि प्रेक्षकांना गर्वाची अनुभूती देतो.