KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...

Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 18, 2025, 02:01 PM IST
KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला... title=
नव्या वादाला फुटलं तोंड (प्रातिनिधिक फोटो)

Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकीपिडीयावरील वादग्रस्त मजुरावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवप्रेमींनी या प्रकरणासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. असं असतानाच दुसरीकडे 'देशद्रोही' फेम अभिनेता तसेच सिनेसमीक्षक कमरान अकमाल खानने विकीपिडीयावरील वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा केला आहे. या वादात उडी घेत विकीपिडीयावरील वादग्रस्त मजकूर कमाल अकमाल खानने आपल्या एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.

'छावा'मुळे सध्या विषय चर्चेत

अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंधाना आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाने नटलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' चित्रपट जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये जगभरात 170 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अगदी पहाटेचे शो सुद्धा हाऊसफूल ठरत आहेत. असं असतानाच 'छावा' चित्रपटाचे रिव्ह्यू समोर येत आहेत. कमरान अकमाल खानने या चित्रपटाला केवळ 1 स्टार दिला आहे. त्याने केलेल्या रिव्ह्यूवरुनही त्याला ट्रोल केलं जात असतानाच आता कमरान अकमाल खान पुन्हा बरळला आहे.

माहितीशी जाणीवपूर्वकपणे छेडछाड

सामान्यपणे कोणत्याही विषयाबद्दलची माहिती शोधण्यासाठी विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. विकिपिडियावर कोणीही माहिती अपडेट करु शकतो. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या इंग्रजी विकिपिडियावर कोणीतरी खोडसाळपणे जाणिवपूर्वक पद्धतीने शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन करणारा मजकूर पोस्ट केला आहे. या कृतीचा शिवप्रेमींकडून विरोध केला जातोय. शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी 'झी 24 तास'नं मोहीम हाती घेतली आहे. अशातच कमरान अकमाल खानने हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा केला आहे.

कमाल खानवर सरकार कारवाई करणार का? 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पिता-पुत्र म्हणून असणाऱ्या संबंधांचा संदर्भ देत विकिपिडियावर वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आलेला आहे. या मजकुराचा स्क्रीनशॉट व्हायरल होत असतानाच दुसरीकडे कमरान अकमाल खानने ही माहिती पोस्ट केली आहे. 'हा इतिहास असून खरा आहे,' असा मजकूर कमाल खानने ही माहिती शेअर करताना पोस्ट केली आहे. 17 फेब्रवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास कमाल अकमाल खानने ही वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे कमाल खानवर सरकार कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विकिपिडीया प्रकरण आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार असल्याचं म्हटलं आहे. "संभाजीराजेंची बदनामी थांबवण्यासाठी 'झी 24 तास'ने जी मोहिम हाती घेतली आहे त्यामुळं पहिल्यांदा 'झी 24 तास'चे अभिनंदन आणि विकिपिडियाचा निषेध व्यक्त करतो. तात्काळ विकिपिडीयाने ही माहिती काढून टाकावी तसंच विकिपिडीयावर कारवाई करण्यात यावी.मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्या कानावर मी ही गोष्ट टाकणार आहे," असं पडाळकर म्हणाले.