World`s best handwriting : एखाद्या गोष्टीची नोंद करायची म्हटलं किंवा काही संदर्भ लिहून घ्यायचा म्हटलं की अगदी सहजपणे मोबाईलमध्ये Notes App सुरु केलं जातं आणि त्यामध्ये ती माहिती लिहीली/ टाईप केली जाते. किपॅडवर टाईप केलेले शब्द स्क्रीनवर दिसून मोबाईलमध्ये आपोआपच सेव्ह होत जातात. लॅपटॉप, टॅब, आयपॅडवरही हे असंच चित्र.
बदलत्या काळानुरूप प्रत्यक्षात कागद, किंवा वहीपेन घेऊन काहीतरी लिहिण्याची सवय जणू लोप पावत आहे. अनेकांना तर, हल्ली लिखाणाची सवयच न राहिल्यानं कैक दिवसांनी काहीतरी लिहायला घेतलं की उगाचच आपण काहीतरी नवं करत आहोत याचीच जाणीव होते. पण, असं नेमकं का होतं? आपण लिखाण खरंच विसरतोय का?
वरील प्रश्नाचं उत्तर आहे, 'नाही.' लिखाण मागे पडत असलो तरीही त्याचा विसर पडलेला नाही. किंबहुना लिखाण हे अनेकांसाठीच व्यक्त होण्याचं एक उत्तम माध्यम असून, शैक्षणिक अभ्यासक्रमांपलिकेही लिखाणाचं अतीव महत्त्वं असून याच लिखाणामुळं आणि लैखनशैलीमुळं एका तरुणीला चक्क संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.
प्रकृती मल्ला असं या मूळच्या नेपाळच्या असणाऱ्या तरुणीचं नाव. आपल्या सुंदर हस्ताक्षरानं तिनं सध्या सर्वांचं लक्ष वेधलं असून, संगणकीय फाँटप्रमाणंच तिनं स्वत:च्या हातांनी लिहिलेला मजकूर नेटकरी चक्क Zoom करून पाहत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा फोटो "world's most beautiful handwriting" असल्याचंही म्हणत आहेत. अवघ्या 16 व्या वर्षी, साधारण आठवी इयत्तेत असताना प्रकृतीनं लोकप्रियता मिळवली होती. तिनं पूर्ण केलेली असाईन्मेंट आणि त्यात दिसणारं तिचं सुवाच्च अक्षर जगभरात कौतुकास पात्र ठरलं होतं.
यावेळी प्रकृतीनं संयुक्त अरब अमिराती येथील नागरिक आणि नेतृत्त्वाला उल्लेखून एक अभिनंदनपर मेसेज लिहिला होता. तिनं स्वहस्ते हे पत्र दूतावासाकडे सोपवलं होतं. ज्यानंतर तिच्या या हस्ताक्षराची जगभरात चर्चा सुरु झाली आणि निमित्त ठरलं ती म्हणजे सोशल मीडिया पोस्ट.
Congrats letter written by Prakriti Mala,the most beautiful calligraphy in the world.Blessings to the UAE under the leadership of H.H. Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan,President of UAE. it was presented to the embassy during the ceremony of the 51st spirit of the Union Day. pic.twitter.com/CpLGhXkBhk
— UAE Embassy Nepal (@UAEEmbNepal) December 7, 2022
नाव घेऊ त्या प्रकारचं तंत्रज्ञान, एआयची उपलब्धता असतानाही इतकं सुरेख हस्ताक्षर असणारी प्रकृती सध्या अनेकांसाठीच आश्चर्याचा विषयही ठरत आहे. जगभरातील हस्ताक्षर विशेषज्ज्ञही तिच्या या कौशल्यानं प्रभावित झाले आहेत. असं कोणी, सुरेख हस्ताक्षर असणारं तुमच्या ओळखीत आहे का?