GPay Roll Out New AI Powered Feature: ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलं आहे. त्यातही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने क्यू आर कोड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून होणारे व्यवहार दिवसांदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या अगदी एक रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत कोणाला पैसे पाठवायचे असतील तरीही 'गूगल पे' सारख्या सेवाचा वापर केला जातो. ही सेवा अगदी 24 तास उपलब्ध असते. एखादी वस्तू घेतली की व्यापाऱ्याकडून किंवा दुकानदाराकडे स्कॅनर मागून किंवा मोबाइल नंबरच्या मदतीने 'गूगल पे' ॲपवरुन पेमेंट करता येते. मात्र अशा व्यवहारांदरम्यान घाई गडबडीमध्ये कधीतरी रक्कमेच्या जागी चुकून पिन नंबर टाकला जातो किंवा चुकीची रक्कम टाकली जाते आणि घोळ होतो. अशा चुका लक्षात घेत त्या होऊ नये म्हणून 'गूगल पे'ने एक खास नवं खास फिचर (Voice Assistance Feature) लॉन्च केलं आहे.
'गूगल पे'ने आपल्या युजर्ससाठी पेमेंट करताना वापरता येईल असे एआय फीचर्स सुरु केलं आहे. आता गुगल पेवर फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडवर यूपीआय पेमेंट करता येणार असल्याची माहिती भारतातील गुगल पे चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी दिली. या नव्या व्हॉइस फीचरद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल पेमेंट करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या फीचर्सबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी यूपीआयवर अवलंबून राहणाऱ्या सर्वांसाठी हे व्हॉइस कमांड अपडेटचे फीचर महत्त्वाचे ठरणार आहे.
'गूगल पे'मध्ये व्हॉईस कमांडमुळे फार टेकसेव्ही नसलेल्या आणि तांत्रिक दृष्ट्या अशिक्षित असलेल्यांनाही ऑनलाइन पेमेंट करणे अधिक सोपे होणार आहे. कारण व्हॉस कमांडद्वारे व्यवहार हाताळता येणार आहेत. या फिचरला ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हॉईस असं नाव देण्यात आलं आहे. गुगलने स्थानिक भाषांमध्ये पेमेंट फॅसिलिटी सुलभ करण्याच्या उद्देशाने एआय (आर्टीफिशीअल इंटेलिजन्स) प्रकल्पावर भारत सरकारबरोबर काम करत आहे. यासंदर्भातील करारही झाला आहे.
भारतामधील सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी गूगल मशीन लर्निंग आणि एआय तंत्रज्ञानामध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करत आहे. या फीचरमुळे ग्राहकांना ऑनलाइन घोटाळे आणि धोक्यांपासून सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नोव्हेंबर 2024 च्या अहवालानुसार, एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये 'गूगल पे'चा वाटा 37 टक्के वाटा आहे, तर फोन पेकडे 47.8 टक्के वाटा आहे. त्यामुळे एकूण भारतातील UPI बाजारपेठेत या प्लॅटफॉर्मचा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे; तर आगामी व्हॉइस फीचर्ससह अधिक युजर्स त्यांच्या व्यवहाराच्या गरजांसाठी 'गुगल पे'कडे वळतील आणि त्याचा वापरकर्ता आधार आणखी वाढेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.