Maharani Yesubai: छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य जितकं थोर आहे तितकाच त्याग महाराणी येसूबाई यांनीही स्वराज्यासाठी दिला आहे. संभाजीमहाराजांना कैद केल्यानंतर त्यांनी मोठ्या हिमतीने त्यांनी रायगडावरील परिस्थिती सांभाळली. येसूबाई यांच्याकडे महाराणी पद तर होतेच पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी एक जबाबदारी दिली होती. ती म्हणजे कुलमुखत्यार पद. शिवरायांनी महाराणी येसूबाईंना स्वराज्याच्या राजकारभारातही सामील करुन घेतलं होतं. त्यावरुनच त्यांच्या हुशारीची चुणूक दिसून येते. शिवराय आणि शंभूराजेंची राजमुद्रा होती त्याप्रमाणेच येसूबाई यांचीही नाममुद्रा होती.
राज्यकारभार चालवण्यासाठी राजमुद्रा खूप गरजेची असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची स्वतंत्र राजमुद्रा होती. त्याचप्रमाणे महाराणी येसूबाई यांचीही नाममुद्रा होती. येसूबाईंच्या नाममुद्रेवर जिजाऊंच्या नाममुद्रेंचा प्रभाव होता, असं म्हटलं जातं. महाराणी येसूबाईंची नाममुद्रा फारशी भाषेत आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येसूबाईंची नाममुद्रा मांडण्यात आली होती.
येसूबाईंची नाममुद्रा ही गोलाकार व एक इंच व्यासाची असून चांदीची आहे. 1976 साली पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनायलय मुंबई येथून साताऱ्यातील वास्तुसंग्रहालयात सामील झाल्याची नोंद आहे.
नाममुद्रेवर 'राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई' असे शब्द आहेत. या नाममुद्रेवर 'सनह अहद' असा शब्द आहे. याचा अर्थ पहिले वर्ष असा होतो. फारसी भाषेत प्रथम वर्षाला अहद म्हणतात. नाममुद्रेबरोबर 'मोर्तब सूद' अशी लहान आकाराची आणखी एक मुद्रा असून पत्राच्या शेवटी याचा वापर केला जात असावा. मुद्रांवरील अक्षरे उलट कोरलेली असायची जेणेकरून शिक्का कागदावर उमटवताना तो सरळ उमटेल. महाराणी येसूबाई यांची मुद्रा उमटलेले कुठलेही पत्र अजून उपलब्ध झालेले नाही.
राजमाता जिजाऊ यांची एक नावमुद्रा होती जी फारशीमध्ये होती. त्यां आपल्या पत्रांवर ही मुद्रा वापरत असत. त्यातील एक पत्र देखील उपलब्ध आहे. राजमाता जिजाऊंची नाममुद्रा सोन्याची होती. जिजाऊंच्या नाममुद्रेवर लिहलं होतं 'वालिदा ए राजा शिवाजी जिजाबाई' त्याचा अर्थ 'राजा शिवाजी यांची आई जिजाबाई' असा होतो.