तर.. २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे सहज शक्‍य; प्रशांत किशोर यांनी सांगितला ऍक्शन प्लॅन

विधानसभा निवडणुकीचे निकाल प्रतिकूल आले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करता येईल.   

Updated: Jan 25, 2022, 04:57 PM IST
तर.. २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे सहज शक्‍य; प्रशांत किशोर यांनी सांगितला ऍक्शन प्लॅन title=

नवी दिल्ली : भले ५ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष विजयी झाला तरी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करता येऊ शकेल असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे. मात्र, या निवडणुकीचे निकाल प्रतिकूल आले तरी हरकत नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांना योग्य मार्गाने संघटना उभारण्याची गरज आहे.

कोणताही पक्ष, टीएमसी, काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने उर्वरित पक्षांना एकत्र केले, त्यांनी आपल्या संसाधनांचा योग्य वापर केला आणि नवीन रणनीती ठरवली तर विरोधी पक्ष २५० ते २६० जागांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, केवळ या पक्षांनी एकत्र येऊन चालणार नाही तर योग्य मार्गाने संघटना उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा आहे, त्यांच्याकडे किमान ५ ते १० वर्षांचे व्हिजन असले पाहिजे. हे काही पाच, दहा महिन्यांत होऊ शकत नाही. तसेच, उत्तर आणि पश्चिमेला १०० जागा जिंकणे आवश्यक आहे. २०२४ साठी विरोधी आघाडी तयार करण्यासाठी मदतीला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये २०० जागा जिंकल्या तरीही तुम्ही भाजपला हरवू शकत नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, देशाला व्यक्तींची नव्हे तर प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसी आता पश्चिम बंगालमधून बाहेर पडू इच्छित आहे. त्यांची संघटना देशभरात व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

आपण काँग्रेस पक्षाला खूप मानतो. मात्र, काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा असूनही माझी आणि त्यांची विचारसरणी जमली नाही. सुमारे ४-५ महिने काँग्रेसशी चर्चा झाली, मात्र पुढे काही झाले नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.