उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. येथे एक मिनी बस रस्त्यावरुन घसरुन अलकनंदा नदीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 26 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मिनी बसमध्ये एकूण 26 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना एअरलिफ्ट करुन एम्स ऋषिकेशमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. तसंच 9 जणांना रुद्रप्रयाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रद्रप्रयाग जिल्ह्यात रैतोलीजवळ ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर हा अपघात झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस सध्या बचावकार्यात व्यग्र आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जे लोक रस्त्याच्या शेजारी उभे होते तेही जखमी झाले आहेत.
रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितलं आहे की, "मिनी बस दिल्लीवरुन येत होते. हे सर्व प्रवासी बद्रीनाथला निघाले होते. मिनीबसमध्ये 26 लोक प्रवास करत होते. यातील 16 जणांना वाचवण्यात आलं आहे. नदीमध्ये अद्यापही बचावकार्य सुरु आहे. एका मुलाने नदीत उडी मारली होती, त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही".
शनिवारी सकाळी जवळपास 11 वाजता रैतोली गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गाडी रस्त्यावरुन घसरल्यानंतर जवळपास 250 मीटर खोल कोसळली आणि अलकनंदा नदीत जाऊन पडली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही फार दु:खद घटना असल्याचं सांगितलं आहे. तसंच जिल्हा दंडाधिकाऱी या दुर्घटनेची चौकशी करतील अशी माहिती दिली आहे. "मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मी बाबा केदार यांना जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.