Maruti SUV Test drive Accident: आपली स्वत:ची गाडी असावी असं प्रत्येकाला वाटतं. गाडी घ्यायची म्हटलं की आधीचा रिसर्च आणि त्यानंतर प्रत्यक्षात गाडी घ्यायच्या आधी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट ड्राइव्हही (Test drive) तितक्याच उत्सुकता वाढवणाऱ्या असतात. मात्र तुम्ही टेस्ट ड्राइव्ह गेण्याचा विचार करत असाल तर आधी नीट विचार करा. कारण उत्तर प्रदेशमधील एका भावी ग्राहकाला असाच उत्साह चांगालच भारी पडल्याचं दिसत आहे. गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेताना आपण चांगले चालक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गाडीसंदर्भातील सुरक्षा यंत्रणाही ठाऊक असणे आवश्यक असल्याचं या उदाहरणावरुन दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने (Maruti SUV) त्यांची ग्रॅण्ड व्हिस्तारा एसयुव्ही (Grand Vitara SUV) ही गाडी रिलॉन्च केली. सध्या या गाडीची जोरदार विक्री सुरु आहे. जाहिराती, गाडीचे फिचर्स आणि ऑफर्समुळे ही गाडी नेमकी आहे तरी कशी हे पाहण्यासाठी अनेकजण तिची टेस्ट ड्राइव्ह घेताना दिसत आहेत. अशाचप्रकारे मेरठमधील एका व्यक्तीने या गाडीचे टेस्ट ड्राइव्ह घेतली. मात्र या टेस्ट ड्राइव्हदरम्यान तो इतक्या वेगात पळवत होता की गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने चालक आणि डिलरशीप एजंट दोघांनाही कोणत्याही पद्धतीची दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं फार नुकसान झालं असून गाडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या अपघातानंतर गाडी विक्री करणाऱ्या शोरुमने गाडीचं नुकसान या चालकाकडून भरुन घेण्याचा निर्णय घेतला असून या चालकाला शोरुमने तब्बल 1.40 लाख रुपयांचं बील पाठवलं आहे. नुकसानभरपाई म्हणून हे बिल चालकाने भरावं असं शोरुमने म्हटलं आहे. चालक गाडीमधील नवीन फिचर्स तपासून पाहताना अत्यंत वेगाने गाडी चालवत होता, असा दावा शोरुमने केला आहे. मात्र या ग्राहकाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार डिलरशीप एजंटनेच गाडी कितीही पळवा ती फारच सुरक्षित आहे, असं सांगत वेगाने गाडी चालवण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा दावा केला आहे.
हा चालक गाडी चालवत असताना अचानक समोर एक मिनी ट्रक आला आणि गाडीचा अपघात झाला. सामान्यपणे टेस्ट ड्राइव्हदरम्यान गाडीचा छोटामोठा अपघात झाला तर शोरुमच डागडुजीचा खर्च करतात. मात्र या प्रकरणामध्ये गाडीचं झालेलं नुकसान शोरुमने ग्राहकाकडूनच वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ग्राहक आणि शोरुममध्ये यावरुन चर्चा सुरु आहे. शोरुमने ग्राहकानेच पूर्ण बिल भरावे असं म्हटलं आहे तर ग्राहकाने डिलरशीप एजंटमुळे हा अपघात झाल्याचा दावा केला आहे.