Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. यात मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. याच महाविद्यालयांमध्ये भविष्यातील डॉक्टर घडत असतात. पण यासाठी प्रचंड मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. असे असताना काहींना सिनेमातील 'मुन्नाभाई' प्रमाणे पटकन डॉक्टर व्हायच असतं. यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी रविवारी देशभरात नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही विद्यार्थी गैरप्रकार करताना सापडले. बाडमेर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलंय. तो आपल्या छोट्या भावाच्याजागी परीक्षा देत होता. परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना याच्यावर संशय आला. यानंतर त्याचे ओळखपत्र मागण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. यामध्ये हा एकटाच नाहीय. अनेकजण पैसे घेऊन दुसऱ्याच्याजागी परीक्षा देत असल्याचे विविध ठिकामी निदर्शनास आले आहे.
बिहार-झारखंड सहीत राजस्थानच्या मेडीकल कॉलेजमध्ये गैरप्रकार करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. बाडमेर जिल्ह्याच्या मुख्यालयातील एक सरकारी शाळेत खोट्या परीक्षार्थीला पकडण्यात आले. भागीरथ असे या परीक्षा देणाऱ्या मोठ्या भावाचे नाव आहे. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांना याबद्दल माहिती कळवण्यात आली. यानंतर पोलिसांनी आधी पेपर लिहणाऱ्या मोठ्या भावाला आणि नंतर छोट्या भावाला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस दोघांची कसून चौकशी करत आहेत.
बाडमेर जिल्ह्याच्या मुख्यालयाअंतर्गत 8 परीक्षा केंद्र येतात. यातील अंतरी देवी शाळा हे एक परीक्षा केंद्र आहे. येथे परिक्षार्थींवर लक्ष ठेवणाऱ्या नियंत्रकाला भागीरथ नावाच्या तरुणावर संशय आला. यानंतर त्याने पोलिसांना याबद्दल माहिती कळवली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि भागीरथ राम नावाच्या परीक्षा देणाऱ्या तरुणाला पकडण्यात आले. चौकशी केल्यानंतर आपण आपल्या लहान भावाच्या ऐवजी डमी परीक्षार्थी बनून परीक्षा देत असल्याचे त्याने मान्य केले.
हे दोन्ही भाऊ सांचौर जिल्ह्याच्या मेघावा या गावचे आहेत. आरोपी भागीरथ हा जोधपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने अनेकवेळा नीट परीक्षा दिल्या आहेत. गेल्यावर्षी 2023 मध्ये त्याचे सिलेक्शन झाले होते. आता छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी तो परीक्षा द्यायला पोहोचला होता.
आरोपी भागीरथ राम आहा आपला लहान भाऊ गोपाल राम याच्याजागी परीक्षा देताना सापडला. आम्ही दोन्ही भावांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करत आहोत. भागीरथ याने आपला गुन्हा कबुल केलाय असे बाडमेर एएसपी जस्साराम बोस यांनी सांगितले.