15 वर्षांहून अधिक जुनी वाहनं असणाऱ्यांना फटका; केंद्र शासनाच्या निर्णयामुळं आता....

Transport Rules : शासनाचा नवा निर्णय; सर्वसामान्यांनासुद्धा मोजवी लागणार अधिक रक्कम... काय आहे हा निर्णय? सामान्यांवर कसा होणार परिणाम?   

Updated: Feb 11, 2025, 11:17 AM IST
15 वर्षांहून अधिक जुनी वाहनं असणाऱ्यांना फटका; केंद्र शासनाच्या निर्णयामुळं आता....  title=

Transport Rules : कित्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात वैयक्तिक कामांपासून ते व्यवसायिक कामांपर्यंत वाहनांचा वापर करतात. देशातील वाहतूकदारांवर विविध प्रकाराचे कर लावलेले आहेत आणि अशातच केंद्र सरकारच्या परिवहन व रस्ते वाहतूक विभागाने नवा जीआर काढल्याचे वृत्त समोर आले आहे. शासनाने वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कासंदर्भात एक नवा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार, जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या जीआरमध्ये 15 वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी 12 ते 18 हजार रुपये भरावे लागणार असल्याचे नमूद केले आहे.  

देशातील 15 वर्षे जुन्या सर्व रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक यांच्या वाहनधारकांपासून ते सर्वसामान्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या शुल्कात वाढ झाली आहे. सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाला वाहतुक संघटनांचा विरोध होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

यापूर्वी वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी 8 हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, आता यात वाढ झाली असून 12 ते 18 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सरकारने, वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्क वाढीच्या या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी वाहतुक संघटनांकडून केली जात आहे. 

वाहनांची पुनर्नोंदणी करण्यासाठी 'हे' करावे

वाहनाच्या पुनर्नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?

1: नाहरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणे

आधी तुम्हाला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून वाहन चोरीला गेले नाही याची पुष्टी करून घ्यावी लागते आणि मोटार वाहनावर कर्ज असल्यास फॉर्म 35 मध्ये वित्तपुरवठा करणाऱ्याकडून नाहरकत प्रमाणपत्र  (एनओसी) घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या राज्यात पुन्हा नोंदणी झाल्यास आरटीओकडून एनओसी मिळविण्यासाठी, फॉर्म 27 आणि 28 आरटीओकडे जमा करावा लागेल.

2: आरटीओमध्ये कागदपत्रे जमा करणे

अर्जाव्यतिरिक्त विम्याची प्रत, मूळ आरसी, पीयूसी प्रमाणपत्र आणि वाहनाचे मूळ चलन यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि आपल्या स्वाक्षरीचे ओळखपत्रही सादर करावे लागते.

3: फी आणि रोड टॅक्स भरणे

एकदा तुम्ही कागदपत्रे जमा केल्यानंतर आणि नोंदणी प्राधिकरणाकडून त्याची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला पुढे अर्ज शुल्क तसेच रस्ता कर भरावा लागेल. भविष्यातील काही समस्यांकरिता रस्ता कर पावती आणि शुल्काची पावती सुरक्षितपणे ठेवावी. तुम्ही तुमच्या वाहनाची दुसऱ्या राज्यात पुनर्नोंदणी केली असेल, तर तुम्ही पूर्वीच्या RTO येथे कर परतावासाठी अर्ज करू शकता.