Santorini earthquakes : पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांच्याच यादीमध्ये एकदा तरी भेट द्यायच्या ठिकाणांची नावं नमूद केलेली असतात. अशाच एका निसर्गरम्य, Photogenic आणि तितक्याच लोकप्रिय ठिकाणावर सध्या एक मोठं संकट ओढावलं असून, तिथं ओढावलेली परिस्थिती पाहता भविष्यात इथं पर्यटकांचा ओघ कमी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्रीसमधील सँटोरिनी या बेटावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येणाऱ्या भूकंपांचा आकडा आता मोठ्या फरकानं वाढला आहे. सुरुवातीला दोन दिवसांमध्ये 200 भूकंप पचवलेल्या याच सँटोरिनी बेटावर आतापर्यंत 10 हजारांहून अधिक कमीजास्त तीव्रतेचे धरणीकंप जाणवल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली आहे.
प्राथमिक स्वरुपात ग्रीक सिविल प्रोटेक्शन मिनिस्ट्रीनं रविवारी जारी केलेल्या अधिकृत माहितीमध्ये सँटोरिनी आणि अमोर्गोस बेटांवर 200 हून अधिक भूकंप जाणवल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. भूकंपांचं सत्र इथं सुरूच असताना आता हा आकडा 10000 वर पोहोचला असून, दरम्यानच्या काळात 5.3 रिश्टर स्केल इतकी सर्वाधिक भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. Kathimerini या स्थानिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार सँटोरिनी आणि अमोर्गोस दरम्यानच्या समुद्रात दक्षिण पश्चिमेला साधारण 14 किमी खोलवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं.
5, 5.1 आणि 5.2 नंतर आता 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला असला तरीही हा याहीपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप इथं येण्याचा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला. हल्लीच्या दिवसांमध्ये सँटोरिनी आणि नजीकच्या भागातून जवळपास 6000 हून अधिक नागरिक आणि पर्यटकांनी इथून काढता पाय घेतला. हाताशी असणाऱ्या सर्व गोष्टी घेत आणि जीव मुठीशी घेऊन या मंडळींनी हे बेट सोडलं.
प्रशासनानं येथील परिस्थिती आणि नैसर्गिक हालचालींचा आढावा घेत स्थानिकांना बेटांपासून दूर राहत पूल रिकामे करण्याच्या सूचना देण्यातआल्या आहेत. शिवाय बंदीस्त ठिकाणी एकत्र येऊ नये, शाळा बंद ठेवाव्यात अशाची सूचना केल्या. सततचे हे भूकंप कोणत्याही ज्वालामुखीचे संकेत नसले तरीही सावधगिरी बाळगण्याचे निर्देश इथं तज्ज्ञांनी दिले आहेत.
प्रामुख्यानं इथं अम्मौदी, अर्मेनी, कोर्फोस आणि फिरा इथं न जाण्याचा सल्ला दिला असून इथं मोकळ्या जागेत काही तंबू उभारम्यात आले आहेत. स्थानिक पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलही या परिस्थितीमध्ये सतर्क असून, आपत्ती व्यवस्थापन तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिओफिजिक्स आणि सीस्मोलॉजीचे प्राध्यापत कोस्टास पापाजचोस यांनी या प्रसंगी 6.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप सँटोरिनीनमध्ये हाहाकार माजवू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.