Annu Kapoor and Sunil Pal on Ranveer Allahbadia : दिग्गज अभिनेता अन्नू कपूर आणि सुनील पाल यांनी आता रणवीर अलाहबादिया या वादात त्याची प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर रणवीर अलाहबादियानं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पॉडकास्टर म्हणून हजेरी लावली होती. त्यानं एका स्पर्धकाला पालकांविषयी एक घाणेरडा प्रश्न विचारला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर लोकं संतापले आहेत. आशिष चंचलानीपासून अपूर्व मखीजापर्यंत एसएईच्या सगळ्या परिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत शोचा तो भाग जेखील युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. त्या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी, असं अन्नू कपूर यांनी म्हटलं आहे. तर सुनील पालनं सांगितलं की त्याच्यासोबत दहशतवाद्यांसारखे वागायला हवे.
अन्नू कपूर यांनी IANS ला उत्तर देत सांगितलं की 'ओटीटीवर काम करणारे हे लोक, ज्यांना टेलिव्हिजनमध्ये काही प्रतिबंध होते. प्रेक्षकांना काय हवं आहे हे त्यांना चांगलं माहित आहे. जर तुम्हाला अश्लीलता हवी असेल तर ते तुम्हाला देण्यासाठी मी तयार आहे. हे सगळं जी काही मागणी आहे त्यामुळे आणि जे दिलं जातं त्यासाठी आहे. एक टक्के लोकं सुद्धा असे नसतील, ज्यांना असा कंटेट आवडत नसेल.
पुढे त्याला शिक्षा झाली पाहिजे हे सांगत अन्नू कपूर म्हणाले, 'आपल्या संविधानात जी काही प्रक्रिया आहे, जी काही शिक्षेची प्रक्रिया आहे, त्याला लगेच ती लागू करायला हवी. विचारण्याची गरज नाही. जर शिक्षेची गरज आहे, तर दिलीच पाहिजे.'
हेही वाचा : अश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
याशिवाय कॉमेडीयन सुनील पालनं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यांना स्टँड-अप कॉमेडियन म्हणू नका. असे करणे खऱ्या स्टँड-अप कॉमेडीयनचा अपमान ठरेल. ते अशिक्षित लोक आहेत ज्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले पाहिजे. आपले तरुण प्रतिष्ठित कुटुंबातील जबाबदार आणि सुसंस्कृत व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. तर विनोदी कलाकारांना सार्वजनिक व्यासपीठावर आमंत्रित केले जाते, इतकंच नाही तर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरतात. वाईट गोष्ट ही आहे की या कार्यक्रमांचे आयोजक सुशिक्षित लोक आहेत. ते अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत.'