Indian Railway Ticket Reservation : एक काळ होता, जेव्हा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी रेल्वे स्थानकांवर जाऊन तिथं तिकीट खिडकी उघडण्याची प्रतीक्षा करावी लागे. त्यासाठी लांबच लांब रांगेत उभं राहणं असो किंवा मग तिकीटासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी पाहत बसणं असो. ही सर्व कामं अनेकांनीच केली असावीत. काळ बदलला आणि नव्या तंत्रज्ञानासह तिकीट आरक्षणाची पद्धतही बदलली. सुरुवातीला संगणकीय आणि आता तर, एका क्लिकवर हातातल्या मोबाईलमधील App नंसुद्धा ट्रेन तिकीट काढता येते.
अनेकदा तिकीट काढण्याची पद्धत सोपी असल्या कारणानं बरीच मंडळी ऑनलाईन पद्धतीला (Online Ticket Reservation) ला प्राधान्य देतात. पण, प्रत्यक्षात मात्र तिकीट खिडकीवर जाऊन प्रवासासाठीची बुंकिंग करणं अॅपच्या तुलनेत बरंच स्वस्त पडतं हे तुम्हाला माहितीये का? आणि हे असं का, यामागचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?
आसन व्यवस्था आणि रेल्वेगाडीमध्ये कोणताही फरक नसताना मग, तिकीटांचे दर वेगळे कसे? या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारनंही दिलं आहे. रेल्वे प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. अॅप किंवा वेबसाईटनं हे सहज शक्य होतं, जिथं सर्वप्रथम प्रवाशांना त्यांच्या नावाचं खातं तिथं सुरू करावं लागतं. थोडक्यात ही अधिकृत नावनोंदणी असते. इथं नोंदणी केल्यामुळं थेट स्थानकावर जाऊन रेल्वेतिकीट काढण्याचे कष्ट सहज वाचवता येतात.
रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर आरक्षण करायचं झाल्यास प्रवाशांसाठी पीआरएस (Passenger Reservation System) काउंटर सुरु करण्यात आलं असून, तिथंही आरक्षण करता येतं. ही एक संपूर्ण संगणकीय प्रणाली असून, इथं तिकीट आरक्षित किंवा रद्द करता येते. सकाळी 8 ते रात्री 8 अशा वेळेत PRS काउंटर सुरु असतं. पण, स्थानकांनुसार या वेळा बदलूही शकतात.
राहिला मुद्दा दरांमध्ये असणाऱ्या फरकांचा तर, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील प्रश्न संसदेत उपस्थित केला. येत्या काळात सरकार IRCTC च्या तिकीट आरक्षण दरांमध्ये सुधारणा करण्याची कोणतीही योजना आखत आहे का? हा प्रश्न त्यांनी मांडला. यावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देत म्हटलं, 'IRCTC कडून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षणाची सुविधा देतं, ज्यामुळं त्यांना तिकीट खिडकीपर्यंत जाण्याची गरज भासत नाही आणि वेळेचीही बचत होते.'
वैष्णव यांच्या माहितीनुसार IRCTC ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला सक्रिय ठेवण्यासाठी, सतत अपग्रेड करण्यासाठी आणि या प्रणालीचा वेगानं विस्तार करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. ज्यामुळं प्रवाशांकडून तिकीटांच्या दरांतून 'कन्विनियन्स फी' आकारली जाते. याशिवाय ऑनलाईन तिकीट आरक्षणामध्ये बँकांनाही या व्यवहारासाठी ठराविक रक्कम प्रदान करावी लागते. दरम्यान तिकीटांच्या दरात फरक असूनही प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षणाचा फायदा होत असल्यामुळं देशभरात जवळपास 80 टक्क्यांहून अधिक आरक्षण हे याच पद्धतीनं होत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
ऑनलाईन पद्धतीननं तिकीट काढल्यास वेळ वाचतो आणि सहजपणे तिकीट काढता येतं. उलटपक्षी रेल्वे स्थानकावर गेल्यास तिकीटाचे दर तुलनेनं कमी असतात ही बाब मात्र नाकारता येत नाही. त्यामुळं पुढच्या वेळी रेल्वेचं तिकीट काढताना कोणता पर्याय निवडायचा याचा व्यवस्थित विचार करा.