मुंबई : रविवार १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सिंह राशीतील मघा नक्षत्रात 'लिओनिड' उल्कावर्षाव पहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,' उल्कावर्षावाचे निरीक्षण करणे ही खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते'.
१७ नोव्हेंबर रोजी रविवारी रात्री ( सोमवारी पहाटे ) ३ वाजण्याच्या सुमारास ईशान्य ( नार्थ-ईस्ट ) क्षितिजावर मघा नक्षत्रातून उल्कावर्षाव होताना दिसेल. यावर्षी आकाशात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार आहे. तरीही तासाला १०-१५ उल्का पडतांना दिसतील असा अंदाज आहे. शहराच्या बाहेर जाऊन निरीक्षण केल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो.
पृथ्वी या दिवशी '५५पी टेंपल टटल' या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. दर ३३ वर्षांनी हा धूमकेतू पृथ्वीपाशी येत असतो. त्यामुळे दर ३३ वर्षांनी या दिवशी मोठा उल्कावर्षाव पहायला मिळतो. १७ नोव्हेंबर २००० रोजी अर्नाळा येथून आपण शंभर विद्यार्थ्यांसमवेत या उल्कावर्षावाचे निरीक्षण करतांना तासाला चारशे उल्का पडतांना पाहिल्याचे श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसा मोठा उल्कावर्षाव आता १७ नोव्हेंबर २०३३ रोजी पहायला मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.
खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. शहरांमध्ये उल्कावर्षाव पाहताना अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे शहरातून बाहेर जाणं योग्य ठरेल.