Corona virus: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला; आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ

Corona virus: सध्या राज्यात एकूण 53 एक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. याशिवाय 2 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 23, 2023, 07:14 AM IST
Corona virus: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला; आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ title=

Corona virus: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान 21 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तर 16 ते 22 डिसेंबर दरम्यान 68 जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण 676 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत 8, ठाण्यात 4, कल्याण-डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 1, सांगलीत 2, पुण्यात 1 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. 

सध्या राज्यात एकूण 53 एक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. याशिवाय 2 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत सर्वाधिक 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ठाण्यात 14, रायगडमध्ये 4, पुण्यात 10, सांगलीत 2, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि कोल्हापुरात 1 एक्टिव्ह रुग्ण आहेत.

पॅनिक होण्याची गरज नाही

माजी टास्क फोर्स सदस्य डॉ.सुभाष साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार, सध्या घाबरण्याची गरज नाही. पण सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्षही करता येणार नाही. हा विषाणू सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे लोकांनी सावध राहिलेलं कधीही उत्तम. विशेषत: ज्यांना इतरही आजार आहेत. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. मास्क घालणं खूप महत्वाचे आहे. सरकारला मानव संसाधनाकडे लक्ष देण्याबरोबरच चाचणी सुविधा मजबूत करावी लागेल. 

महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर

राज्यातल्या कोरोना संकटामुळे आरोग्य खातं अॅक्शनमोडवर आलंय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेबाबत सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केलीये. यामध्ये लस, रुग्णालयातले बेड्स, ऑक्सिजन बेड आणि औषधांच्या साठ्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. 

केरळमध्ये रूग्णंसंख्येत होतेय वाढ

देशताली एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या केरळ राज्यात आहेत. गेल्या चोवीस तासात केरळात सर्वाधिक 265 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. केरळात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,606 इतकी आहे. केरळात गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे 72,060 जणांचा मृत्यू झाला.