Trending News : लग्न मंडप सजला होता, नवरदेवाचं कुटुंब, नातेवाईक वरातीत सहभागी होण्यासाठी एकत्र जमले होते. तिकडे वधूच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेंहदी रंगली होती. पण घरातून निघालेला नवरदेवच अचानक गायब झाला. या घटनेची सर्वत चर्चा रंगली. नवरदेव नक्की कुठे गेला याचा पत्ताच लागत नसल्याने अखेर नवरदेवाच्या लहान भावाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या.
उत्तरप्रदेशमध्ये पीलीभीतमधली ही हैराण करणारी घटना आहे. इथल्या महमददपूर सिमरा गावात राहणाऱ्या श्याम अवध यांचा मोठा मुलगा शशांत तिवारी याचं लग्न ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आणि लग्नाचा दिवसही उजाडला. अवध यांच्या घरात आनंदी वातावरण होतं. लग्नासाठी अनेक नातेवाईक हजर झाले होते. संध्याकाळी वरात मुलीच्या घरी निघणार होती. फुलांनी सजवलेली गाडी आणि बँडबाजाही तयार होता.
लग्नासाठी शशांकची तयारीही पूर्ण झाली होती. हेअरस्टाईल करण्यसाठी आणि केस कलर करण्यासाठी शशांक दुपारी सलूनमध्ये गेला. पण संध्याकाळ होत आली तरी तो घरी परतला नाही. इथे घरचे त्याची वाट पाहून थकले. रात्र होत आल्यानंतरही शशांक घरी न परतल्याने त्याचा शोध सुरु झाला. पण यानंतरही त्याचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही.
तिकडे मुलीच्या घरचे वरातीची वाट पाहून थकले. अखेर समाजात आपली नाचक्की होऊ नये यासाठी श्याम अवध यांनी आपला छोटा मुलगा म्हणजे शशांकच्या लहान भावाचं लग्न ठरलेल्या मुलीशी करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरच्यांनाही देखील ही गोष्ट कळवण्यात त्यांच्या संमतीने अखेर लहान भावाशी लग्न करण्यास मुलगी आणि त्याचं कुटुंब तयार झालं.
हे ही वाचा ! 'तो' आई होणार! भारताचा पहिला ट्रान्समेल गरोदर, फोटोशूट करत दाखवला बेबी बंप
मिळालेल्या माहितीनुसार श्याम अवध यांचा मुलगा शशांक या लग्नासाठी तयार नव्हता. त्याचं दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध होते. पण घरच्यांच्या दबावामुळे तो या लग्नाला तयार झाला. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत त्याने घरच्यांना थांगपत्ता लागू दिला नाही. पण ऐन लग्नाच्या दिवशी सलूनमध्ये जात असल्याचं सांगून तो घरातून पसार झाला. काहीही असो पण या प्रकरणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली.