नवी दिल्ली : एक महिला एका भारतीय सेनेच्या जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता... काय घडलं होतं यावेळी, याबद्दल आता या सैनिकानं आपली बाजू मांडलीय.
महावीर सिंह असं या सैनिकाचं नाव आहे. भारतीय सेनेमध्ये ते जेसीओ पदावर कार्यरत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या महिलेला म्हणजेच स्मृती कालरा यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांचा जामिनावर सुटकाही करण्यात आली.
या घटनेविषयी महावीर सिंह यांनी दु:ख व्यक्त केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आमची गाडी हळूवार सुरू होती... अचानक आमच्या समोर एक गाडी आली. या गाडीत बसलेली महिला झिग-झॅग करत गाडी संपूर्ण रस्त्यावर चालवत होती... आणि तिनं अचानक ब्रेक मारला. आमच्या गाडीनंही १-२ मीटर दूर अंतरावरच ब्रेक घेतला. तेवढ्यात महिला गाडीतून उतरली आणि तिनं ड्रायव्हरला शिव्या देणं सुरू केलं. जेव्हा ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला तेव्हा या महिलेनं त्याची कॉलर पकडून त्याला मारणं सुरू केलं. गाडीच्या काडा फोडण्याचाही तिनं प्रयत्न केला. हे पाहून मी खाली उतरलो तेव्हा त्या महिलेनं मलाही शिव्या देणं आणि मारहाण करणं सुरू केलं' असं महावीर सिंह यांनी म्हटलंय.
महिलेच्या या व्यवहारानं आम्हाला खूप राग आला पण सेनेनं आम्हाला अनुशासन आणि महिलांचा सन्मान करणं शिकवलंय... त्यामुळे आम्ही शांत राहिलो. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी याची रितशीर पोलिसांत तक्रार दाखल केली, असं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल होतोय.