'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा

PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: "मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 6, 2024, 07:24 AM IST
'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा title=
पंतप्रधान मोदींना दिला इशारा

PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: इस्त्रायमध्ये सत्ताधारी बेंजामिन नेतान्याहू सरकारविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर निशाणा साधला आहे. युद्धाच्या नावाखाली बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये राष्ट्रवादाचा फुगा निर्माण केला. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढतेच याचे इस्रायल हे उत्तम उदाहरण असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इस्रायलमधील सद्य परिस्थितीचा हवाला देत पंतप्रधान मोदींना त्यांचे 'परममित्र' असलेल्या नेतान्याहू यांच्यासंदर्भात घडत असलेल्या घडामोडींवरुन धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.

सत्ताकारण धोक्यात आल्यानंतर राष्ट्रवाद आठवला

"राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील जनतेला कोणीच फार काळ झुलवत ठेवू शकत नाही. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या त्याचाच अनुभव घेत आहेत. नेतान्याहू यांच्याविरोधात इस्त्रायली जनतेच्या संतापाचा पुन्हा स्फोट झाला आहे. नेतान्याहू यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी तेथील जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे. नेतान्याहू यांच्या सरकारी निवासस्थानाला संतप्त नागरिकांनी पेटत्या मशाली घेऊन धडका देण्याचा प्रयत्न केला. इस्त्रायली संसदेबाहेरही लोक आंदोलन करीत असून तेथेच तंबू ठोकून आंदोलन दीर्घ काळ सुरू ठेवण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला आहे. त्यांचा हा इरादा म्हणजे नेतान्याहू यांच्यासाठी धोक्याचाच इशारा आहे. या युद्धाचा वापर नेतान्याहू यांनी त्यांच्या राजकीय स्थैर्यासाठी करून घेतला, या आरोपात तथ्य आहे. कारण हे युद्ध होण्यापूर्वी नेतान्याहू यांचे पद आणि सत्ताकारण धोक्यात आले होते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा फुटतोच

"हमासचा हल्ला आणि नंतर बदला म्हणून इस्त्रायलने सुरू केलेले युद्ध यामुळे बुडण्याच्या मार्गावर असलेली नेतान्याहू यांची राजकीय नौका किनाऱ्याला लागली. त्यांच्याविरोधातील जनतेमधील असंतोष युद्धाखाली झाकला गेला, ही वस्तुस्थिती आहे. हा असंतोष असाच दबलेला राहावा, यासाठी नेतान्याहूंकडून हे युद्ध लांबवले जात आहे, हजारो निष्पाप महिला आणि बालकांचा बळी घेऊनही युद्धपिपासू नेतान्याहू शांत झालेले नाहीत, अशा आरोपांची राळ नेतान्याहू यांच्याविरोधात उडविली जात आहे. आता हेच युद्ध त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी धोका ठरले आहे. राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढते, याची दाहक जाणीव आता नेतान्याहू यांना झाली असेल. आपल्या देशातील मोदी राजवट म्हणजे तरी यापेक्षा वेगळी कुठे आहे?" असा सवाल ठाकरे गटाने 'सामना'मधून उपस्थित केला आहे.

मोदींनीही अशीच हवा भरत सत्ता मिळवली

"नेतान्याहू यांच्याप्रमाणेच त्यांचे परममित्र म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे. या फुग्यात कधी हिंदुत्वाची हवा भरली गेली तर कधी आर्थिक राष्ट्रवादाची. कधी 370 कलमाची तर कधी अयोध्येतील राममंदिर निर्माणाची. कधी भोजशाळा वादंगाची तर कधी नागरिकता सुधारणा कायद्याची. पुलवामासारख्या दहशतवाद्यांनी केलेल्या सैनिकांच्या हत्याकांडाचादेखील त्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापर केला. मोदी सरकारचे अपयश असूनही त्याला राष्ट्रवादाचा मुलामा दिला गेला. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्याचा वापर केला गेला. भ्रामक राष्ट्रवाद आणि धर्मवादाची हवा सत्तेच्या फुग्यात भरायची आणि तो फुगा हवेत सोडून सामान्य जनतेला झुलवीत ठेवायचे," असं म्हणत ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू

"मतलबी राष्ट्रवाद आणि त्याच्या जोरावर साधलेला राजकीय मतलब, या मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेतान्याहू यांनी हमास युद्धाच्या आड त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी फुगविलेला मतलबी राष्ट्रवादाचा फुगा तेथील जनतेने फोडला आहे. आपल्या देशात दहा वर्षांपासून निर्माण केलेला खोट्या राष्ट्रवादाचा भ्रमाचा भोपळादेखील जनता असाच फोडणार आहे. कारण मोदी राजवटीला देण्यात आलेली राष्ट्रवाद-धर्मवादाची कल्हई आता संपली आहे. जनताही त्या भ्रमातून बाहेर आली आहे. इस्त्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार आहेत. मि. मोदी, तुमचे परममित्र मि. नेतान्याहू यांच्याविरोधात तेथे काय घडतेय ते बघताय ना!" असं म्हणत लेखाचा शेवट करण्यात आला आहे.