प्रसाद काथे, अयोध्या : रामाच्या नावानं देशात पुन्हा एक राजकीय वादळ आकार घेत असताना रामाची जन्मभूमी असलेली अयोध्या या वादळाचं केंद्र ठरतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे यात अधिक भर पडली आहे. शनिवारी अयोध्येमध्ये डेरेदाखल झालेल्या उद्धव ठाकरेंनी राममंदिरासाठी अत्यंत आग्रही भूमिका मांडली. रविवारी सकाळी अयोध्येतल्या प्रमुख वर्तमानपत्रांनी उद्धव यांच्या दौऱ्याला ठळक प्रसिद्धी दिली.
विशेष म्हणजे रविवारी शहरातच होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेला वर्तमानपत्रांनी दुय्यम महत्त्व दिल्याचं पाहायला मिळालं. याचं मुख्य कारण उद्धव ठाकरेंमुळेच राममंदिराच्या मुद्द्याला पुन्हा हवा मिळाल्याचं चित्र आहे. अन्य पक्ष आपला मुद्दा पळवून नेतील, अशी भीती भाजपाला वाटत असल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि संघ आक्रमक झाल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जातं आहे.
एकीकडे अयोध्येमध्ये शिवसेनेची हवा असताना रामलल्लाचं दर्शन घेतल्याचं समाधान ठाकरेंबरोबर आलेल्या शिवसैनिकांना मिळालं आहे.
आपल्या अयोध्या दौऱ्यातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. दुसरीकडे आपला निवडणुकीतला हुकुमी एक्का पळवून नेण्याची भीती भाजपाच्या मनात उत्पन्न झाली आहे. त्याच वेळी रामाचं नाव घेत मतांचं पुन्हा एकदा ध्रुवीकरण करण्याचाही ठाकरेंचा प्रयत्न आहे. एका दगडात अनेक पक्षी मारणं ते यालाच म्हणतात.