Nirmala Sitharaman on Income Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करकपाताची मर्यादा वाढवत असल्याचं जाहीर केलं. निर्मला सीतारमन यांनी करकपातीची (Tax Deduction) मर्यादा 50 हजारांवरुन 75 हजारांवर नेत असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच नव्या करप्रणाली (New Tax Regime) अंतर्गत काय बदल करण्यात आले आहेत याची माहिती दिली.
निर्मला सीतारमन यांनी सांगितलं की, नवी करप्रणाली स्विकारलेल्या पगारदात्यांसाठी स्टँटर्ड डिडक्शन वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, त्यानुसार तो 50 हजारांवरुन 75 हजार करण्यात आला आहे. त्याचप्रकारे फॅमिली पेन्शनवरील कपात 15 हजारांवरुन 20 हजारांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे 4 कोटी पगारी कर्मचारी आणि निवृत्तीदारांना लाभ मिळेल.
निर्मला सीतारमन यांनी यावेळी नव्या करप्रणालीत संरचना बदलत असल्याचं जाहीर केलं. यानुसार 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उपन्न्नावर टॅक्स लागणार नाही. 3 ते 7 लाखांपर्यंत्या उत्पन्नावर 5 टक्के, 7 ते 10 लाखांवर 10 टक्के, 10 ते 12 लाखांवर 15 टक्के आणि 12 ते 15 लाखांवर 20 टक्के कर आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के लागणार आहे. या बदलामुळे पगारी कर्मचाऱ्यांना नव्या करप्रणालीत इन्कम टॅक्समधून 17 हजार 500 रुपयांची बचत करता येईल.
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचा स्विकारली असून, आयटीआर फाईल करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करणार असल्याचं सांगितलं. तसंच चॅरिटी, टीडीएससाठी एकच कररचना राहील असं सांगितलं.
थेट परदेशी गुंतणुकीची प्रक्रिया सोपी करणार, एंजल टॅक्स आजपासून बंद करणार अशा घोषणाही यावेळी त्यांनी केल्या. याशिवाय कॅपिटल गेन टॅक्स 20 टक्क्यांवरुन 12.5 टक्क्यांवर नेणार असल्याची माहिती दिली.