नवी दिल्ली: देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या उत्तर प्रदेशातील सामुहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने आज (शनिवार,१४ एप्रिल) भारतीय जनता पाक्षाचा (भाजप) आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयासमोर हजर केले जात असताना सेंगर अंत्यत भांबाऊन गेले होते. जवळपास त्यांचा चेहरा रडकुंडीलाच आला होता. आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा सेंगर यांनी दावा केला. मात्र, न्यायालयापुढे हजर होताना सेंगर यांनी जवळपास तीन वेळा परमेश्वराचा धावा केला. अत्यंत रडवेल्या चेहऱ्याने आणि त्याच आवाजात ते म्हणाले, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा परमेश्वरावर विश्वास आहे. आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांना CJM सुनील कुमार यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अलाहबाद उच्च न्ययालयाने ताशेरे ओढल्यावर आरोपी आमदाराला सीबाआयने अटक केली. पहाटे-पहाटे साडे चार वाजता सीबीआयने आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना इंदिरा नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपी आमदारांवर पास्को कायद्यातील ती मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी आमदाराविरूद्ध कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित युवतीने कुटुंबियांसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रसारमाध्यमातून हे प्रकरण जोरदार चर्चीले जात असल्यामुळे भाजप आणि योगी सरकार बॅकफुटला गेले आहे. या प्रकरणात प्रसारमाध्यमे, विरोधक तसेच, देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मंडळींनी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे.