मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमधील ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाळ यांनी सोमवारी एक वक्तव्य करत सर्वांच लक्ष वेधलं. इस्लाम धर्म भारतात अल्यापासून, अस्पृश्यतेची या देशात सुरुवात झाली असं ते एका कार्यक्रमात म्हणाले. शिवाय दलित, या शब्दाची आणि संकल्पनेची सुरुवात ही ब्रिटीशांकडून फोडा आणि राज्य करा या तत्वाअंतर्गत सुरु झाली असंही ते म्हणाल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी या वक्तव्याला अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी इतिहासातील काही संदर्भसुद्धा मांडले. ''देशात पहिल्यांदाच अस्पृश्यतेची सुरुवात ही इस्लामचा शिरकाव झाल्यानंतरच पाहायला मिळाली. असं म्हटलं जातं, जेव्हा राजा दहीर (सिंधचा शेवटचा हिंदू सम्राट) याच्या राण्या जोहर (आत्मदहनाची प्रथा) करण्यासाठी सज्ज होत्या त्यावेळी या शब्दाचा प्रयोग पाहायला मिळाला. त्यावेळी त्यांच्याकडून 'मलेच्छ' अशा शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. घाई करावी लागेल, नाहीतर 'मलेच्छ'च्या स्पर्शाने आपण अशुद्ध होऊ, असं त्या म्हणाल्या होत्या. त्याचवेळी भारतात पहिल्यांदा अस्पृश्यतेचा शिरकाव झाला', असं गोपाळ म्हणाले.
गोपाळ यांनी या कार्यक्रमात जातीय विभागणी आणि वर्गांविषयीसुद्धा वक्तव्य केलं. जे मौर्य आज अनुसूचित जातींमघ्ये गणले जाता हे गतकाळात उच्च जातीय वर्गात गणले जात होते, असं सांगत त्यांनी इतरही काही उदाहरणं दिली. 'पाल हे बंगालमध्ये एकेकाळचे राजे होते, पण आज त्यांचा मागासवर्गीय म्हणून उल्लेख केला जातो. तर, भगवान बुद्धांची शाक्य ही जात आज इतर मागासवर्गीय प्रवर्गात म्हणजे ओबीसीमध्ये गणली जाते', असं त्यांनी स्पष्ट केलं.
'दलित' हा शब्दच मुळात भारतीय समाजात कधी अस्तित्वात नव्हता. ज्याची सुरुवात ब्रिटीशांनीच केल्याचं गोपाळ यांनी सांगितलं. 'फोडा आणि राज्य करा' या रणनीतीच्या आधारे त्यांनी हा शब्द पुढे आणला, ज्याचा उल्लेख संविधानातही नाकारण्यात आला आहे हे गोपाळ यांनी ठामपणे सांगितलं. भारतात इस्लाम धर्माच्या पगड्याखाली असणारा काळ का खऱ्या अर्थान काळा कालखंड होता, असंही गोपाळ म्हणाले. आपल्या वक्तव्यासाठी त्यांनी थेट वेद- पुराणांमधील दाखलेही दिले. गोपाळ यांच्या या वक्तव्यांनंतर बऱ्याच चर्चांनीही डोकं वर काढलं आहे.